जीवनातील अनेक रंग उलगडणारी नाटय़कला ही पारंपरिक आणि प्राचीन आहे. नाटय़सृष्टीतील अनेक कलावंत मालिका आणि चित्रपटांमध्ये यशस्वी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. परंतु सध्या नाटय़ क्षेत्राकडे खूप कमी जण वळत आहेत. मालिका आणि चित्रपटामध्ये थेट काम करण्याची सर्वच कलाकारांची इच्छा असते. परंतु तेथे जाण्याचा मार्ग नाटय़सृष्टीतून जात असल्याने प्रत्येक कलाकराने नाटय़ क्षेत्रातून कामाचा श्री गणेशा करावा, असा मौलिक सल्ला नाटय़कर्मी रवी वाडकर यांनी नवोदित कलाकारांना दिला आहे.
वाशी येथील न्यू बॉम्बे प्रायमरी स्कूलच्या सभागृहामध्ये नवी मुंबई नाटय़ कलांवत परिषद, प्रतीक थिएटर्स आणि नवी मुंबई कोमसापच्या वतीने आयोजित चौथ्या एकदिवसीय नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यापुढे ते म्हणाले की, नाटय़सृष्टीमध्ये चांगले काम करणाऱ्या कलाकारांमुळे अनेक चांगले दर्जेदार नाटक निर्माण होत आहे. परंतु ते पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांची हवी तेवढी उपस्थिती मिळत नसल्याची खंत वाडकर यांनी व्यक्त केली.
दुपारच्या सत्रात प्रसार माध्यमाच्या रेटय़ात ‘मराठी नाटकाचे भवितव्य’ या विषयावरील चर्चासत्रामध्ये डॉ. विश्वास मेहंदळे म्हणाले की, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळी माध्यमे निर्माण झाली असून घरबसल्या टीव्हीच्या माध्यमातून चित्रपट, मालिका बघता येते. अनेक वेळा नाटकाची तिकिटे अधिक असल्याने, पैसे खर्च करून सर्वच नाटय़रसिक नाटय़गृहात जात नाहीत. त्यामुळे मराठी नाटकांना उतरती कळा लागली आहे.
सरकारी यंत्रणा मोठय़ा संमेलनांवर प्रचंड मोठय़ा प्रमाणात खर्च करते. मात्र लहान संमेलनावर करीत नाही मात्र लहान संमलने होणेदेखील काळाची गरज असल्याचे मत व्यक्त त्यांनी व्यक्त केले.
या वेळी नाटय़कर्मी विलास गुर्जर, अभिनेत्री फैयाज, अरुण म्हात्रे, दिलीप मडकईकर, मुकुंद महाले, प्रा. एल. बी. पाटील यांनी चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला होता. या नाटय़संमेलनाला मोठय़ा संख्येने साहित्य रसिकांनी उपस्थिती लावली होती.