शहरातील पाणी पुरवठा बंद आहे..रस्त्यावर खड्डा आहे..गटार तुंबले आहे..जलवाहिनी फुटली आहे.पथदिवा सुरू व्हावा..गटार बंद व्हावे..डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे..गढूळ पाण्याचा पुरवठा होतो आहे. अशा अनेक समस्यांना ठाण्यातील रहिवाशांना सतत तोंड द्यावे लागते. अचानक उद्भवलेल्या या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांना नगरसेवकांची दारे ठोठवावी लागतात. त्यानंतर पुढील कागदोपत्री सोपस्कार करून ती समस्या  सोडवण्यासाठी बराच काळ जातो. आता ही किचकट प्रक्रिया टाळून नागरिकांच्या मागण्या आणि तक्रारी थेट ऐकून घेण्यासाठी महापालिकेने मोबाइल अ‍ॅप्सद्वारे नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या काही तासांत सुटू शकणार आहेत.
ठाणे शहरात राहणाऱ्या सुमारे १८ लाख नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक समस्या उद्भवत असतात. या समस्या सोडविण्यासाठी सध्या नागरिक आणि लोकप्रतिनिधी लेखी स्वरूपात महापालिका मुख्यालयातील नागरिक सुविधा केंद्रामध्ये पाठवतात. आलेल्या तक्रारी, मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांपर्यंत पाठवल्या जातात. या या प्रक्रियेत बराच वेळ लागत होता. अनेकदा एखाद्या अधिकारी- कर्मचाऱ्याकडून ती तक्रारच गहाळ होऊन जात असल्याने त्याचे पुढे काय झाले याची माहितीही तक्रारदारास मिळत नसे. आता या अडचणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सोडवण्यासाठी तसेच नागरिकांना जलद सुविधा पुरविण्यासाठी ठाणे महापालिकेने मोबाइल अ‍ॅप्सचा पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. त्या माध्यमातून नागरिकांना थेट पालिका प्रशासनाला आपल्या समस्या सांगता येणार आहेत. तसेच त्यावर तात्काळ निर्णय घेण्याची प्रणालीही या सिस्टिममध्ये असल्याने नागरिकांच्या तक्रारींना थेट संबंधित अधिकाऱ्यांची उत्तरे मिळणार आहेत. तसेच त्यावर तात्काळ उपाययोजना करणेही शक्य होणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून आपल्या तक्रारीची नेमकी स्थिती काय आहे, याचीही माहिती नागरिकांना घरबसल्या मिळू शकणार आहे.
खर्च मात्र मोठा..
नागरिकांच्या या सुविधेसाठी महापालिकेस सुमारे ९२ लाख १२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या निधीतून प्रणाली विकसित करण्याबरोबरच तिचा वर्षभराची देखभालही या पैशातून होणार आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
संगणक प्रणाली, मोबाइल अ‍ॅप्सच्या कामाची व्याप्ती..
‘डिमांड ट्रॅकिंग व कम्प्लेंट मॅनेजमेंट सिस्टिम’ असे नाव असलेल्या या प्रणालीद्वारे पाणी, विद्युत रोषणाई, पथदिवे, रस्ते, चौक, पदपथ, उद्याने, स्वच्छता यांसारख्या सेवांबद्दलच्या तक्रारी या अ‍ॅप्सद्वारे सोडवल्या जाणे शक्य होणार आहे. तशा पद्धतीचे मोबाइल अ‍ॅप्स विकसित केले जाणार आहेत. त्यावर नागरिक आणि नगरसेवकांनाही तक्रारी, मागणी, सूचना करता येणार आहेत. तक्रारीसोबत फोटो, तेथील ठिकाणाचे जीपीएस ठिकाण हे सगळे या अ‍ॅप्सवरून जोडता येणार आहे. आलेल्या तक्रारी सोडवण्यासाठी महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही विशेष प्रणाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही प्रणाली विभाग, प्रभागनिहाय तात्काळ अहवाल तयार करून संबंधित अधिकाऱ्याकडे ते पाठवणार आहे. त्यामुळे तक्रार सोडवणे अधिक पारदर्शक आणि वेगवान होऊ शकणार आहे.