स्मशानभूमीअभावी गोसावी समाजातील वृद्ध आजीबाईच्या मृतदेहावर राहत्या घरातच अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की नातेवाईकांवर आली. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली, तसेच शहरातील या समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला आहे.
वाशी येथील अमोल भारत गोसावी यांच्या आजीचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. परंतु गोसावी समाजास स्मशानभूमी नसल्यामुळे नातू अमोल यांच्यासमोर आजीच्या अंत्यसंस्कारासाठी जागेचा प्रश्न उभा ठाकला. आजीला कोठे दफन करावे, या चिंतेने ते त्रस्त होते. मात्र, काहीच पर्याय नसल्याने त्यांनी नाईलाजाने आजीवर राहत्या घरातच अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शहरात गोसावी समाजाची संख्या अल्प आहे. मात्र, समाजासाठी अजूनही स्मशानभूमी उपलब्ध नाही. यापूर्वी अनेकदा समाजातील कोणी मयत झाल्यास स्मशानभूमी व अंत्यसंस्कार कोठे करायचे, हा प्रश्न उद्भवला होता. इतर समाजातील लोकांच्या परवानगीने त्या ठिकाणच्या स्मशानभूमीत मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्याच्या घटना आधीही घडल्या आहेत. एवढेच नाही, तर येथे स्मशानभूमी नसल्याने मृतदेह अन्य गावात नेऊन तेथे अंत्यसंस्कार केल्याचेही या समाजातील नागरिकांनी सांगितले.