दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाला की, प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या आणि एकूणच उत्तीर्णतेत सर्वाधिक प्रमाण राखणाऱ्या युवतींचा आलेख सातत्याने वाढत असल्याचे लक्षात येते. केवळ या परीक्षांमध्ये नव्हे तर, प्रशासकीय सेवा परीक्षेतही हेच दृश्य दिसते. लालफितीची बंधने असणाऱ्या शासकीय व्यवस्थेत काम करणे तसे अवघडच. अवघड या अर्थाने की जनसामान्यांमध्ये त्याबद्दल एकदम वेगळी भावना आहे. ‘दिरंगाई’ हा जणू या व्यवस्थेसाठी लागू केलेला शब्द. संथपणे चालणाऱ्या या प्रशासकीय यंत्रणेला गतिमान करण्याचे काम आता प्रामुख्याने महिला अधिकारी करत आहेत. शासकीय वा पोलीस यंत्रणा याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात असणारी भावना बदलण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना त्यांच्याव्दारे आखण्यात येत आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने, शासकीय यंत्रणेत जबाबदारीचे पद तितक्याच समर्थपणे भूषविणाऱ्या महिलांच्या कार्याचा हा आढावा.

उपवनसंरक्षक अनिता पाटील
41रुबाबदार गणवेशातील ‘फौजदार’ बद्दल ग्रामीण भागात आजही अप्रूप आहे. असे वेगळे काम करायचे स्वप्न बाळगत शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या पुण्यात तिने पाऊल ठेवले. मिळालेली संधी आणि मार्गदर्शनाचा योग्य वापर करत स्वप्नाच्या पलीकडील क्षितिज गाठले. वन विभागाच्या उपवन संरक्षक (पश्चिम) अनिता पाटील-चव्हाण यांचा आजवरचा प्रवास हा असाच आहे. पाटील यांनी प्रशासनाचा सर्वसामान्य जनतेच्या मनात असलेला चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न करताना विश्वासार्हता आणि विविध पातळीवर विस्कळीत झालेला संवाद सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मूळ सातारा जिल्ह्यातील पाटण गावातील मारूध हवेली या छोटय़ाशा गावातील अनिता यांच्या घरात तसा शिक्षणाचा वारसा नव्हता. साध्यासरळ वातावरणात वाढत असलेल्या अनिता यांच्या शाळेत वार्षिक गुणगौरव सोहळ्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील एक अधिकारी आले. त्यावेळी फौजदार म्हणजे खूप मोठे कोणीतरी अशी त्यांची समजूत झाली. मोठे झाल्यावर आपण फौजदारच व्हायचे ही खूणगाठ त्यांनी तेव्हापासून मनाशी बांधली. गावातच १२ वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कऱ्हाड गाठले. विज्ञान शाखेचा अभ्यास करताना स्पर्धा परीक्षा, एमपीएसएसी, युपीएससीमधील फरक, या अंतर्गत येणारी विविध पदे याचा अभ्यास त्यांनी केला. पदवी प्राप्त झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी अनिता पुणे येथे गेल्या. पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पहिल्या प्रयत्नात अपेक्षित यश न मिळाल्याने घरच्यांनी एकटी पुण्यात किती दिवस राहणार, घरी निघून ये, असा तगादा लावला. पुण्यात राहून अभ्यास झाला पाहिजे आणि आपला उदरनिर्वाह व्यवस्थित व्हावा यासाठी त्यांनी नोकरी स्विकारली. २००५ मध्ये त्या एमपीएससी उत्तीर्ण झाल्या. त्यांची निवड पाणी पुरवठा स्वच्छता मंत्रालयाच्या भूवैज्ञानिक कनिष्ठ पदावर झाली. नोकरीत रुजू झाल्यानंतर पुन्हा एमपीएससीचा अभ्यास करताना त्यांना त्यातील विविध आयाम लक्षात आले. इंडियन फॉरेस्ट सव्‍‌र्हिस सेवेकडे त्यांचा कल राहिला. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी म्हैसुर येथे प्रशिक्षण पूर्ण केले. सप्टेंबर २०१२ मध्ये वन विभागाच्या अहमदनगर कार्यालयात त्या दाखल झाल्या. एप्रिल २०१३ पासून त्यांनी पश्चिम विभाग नाशिक उप वनसंरक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. प्रशासकीय सेवेतील १० वर्षांच्या कालावधीत अनिता यांनी विविध पदांवर काम केले आहे. जनसामान्यात ‘सरकारी चालढकल’ असलेली प्रतिमा पुसण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्याचे काम केले. मधल्या फळीतील अधिकाऱ्यांशी समन्वय साधत त्यांनी कर्मचारी बदली, रजा या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे दैनंदिन कामाचा आढावा घेऊन कामे सुरळीत होत आहेत की नाही यावर देखरेख ठेवल्यामुळे कर्मचाऱ्यांना आपली मरगळ झटकत काम करावे लागले. पाटील यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे पांडवलेणी येथील वन उद्यानाला नवी झळाळी प्राप्त होणार आहे.

सहाय्यक पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील
अवघ्या काही महिन्यांवर आलेला कुंभमेळा नेटका पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून त्यादृष्टीने आवश्यक योजनांची 42आखणी झाली आहे. मात्र आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काय करावे, यासाठी नाशिक ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी एक खास प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पाची दखल घेऊन पोलीस महासंचालकांनी त्यांचे विशेष कौतुक केले. मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून कला शाखेत पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या मोक्षदा यांना बालपणापासून कुटुंबियांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. केवळ त्यावर न थांबता प्रशासकीय सेवेत काय करता येईल या दृष्टीने आवश्यक असे वारंवार मार्गदर्शन केले. पदव्युत्तर शिक्षणानंतर मोक्षदा यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. एमपीएससीची परीक्षा तिसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी म्हैसुर-हैदराबाद येथील अकादमीत आपले प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांची नाशिक येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती झाली.
पोलीस विभागात रुजू झाल्याचा आनंद आहे. येथे काम करतांना तुम्ही स्त्री आहात की पुरूष याला महत्व नाही. तुम्ही तुमचे काम किती चोख पार पाडता याकडे सर्वाचे लक्ष असते. पोलीस यंत्रणेत कामाचे तास अधिक आहेत, त्यात आवश्यक सोयी सुविधा असतीलच असे नाही. पर्याय शोधत आपले काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी सांघिक प्रयत्न गरजेचे ठरतात. त्यादृष्टीने सहकाऱ्यांनी केलेली मदत महत्वाची असल्याचे मोक्षदा सांगतात.
आगामी कुंभमेळ्याच्या धर्तीवर त्यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्वाना सुखरूप कसे बाहेर काढता येईल यासाठी त्यांनी एक आराखडा तयार केला आहे. वाहतूक कोंडीसह दहशतवादी हल्ला, पूरस्थिती वा नैसर्गिक आपत्ती कोसळल्यास पोलीस विभाग इतरांवर विसंबून न राहता काय करू शकतो, याचे सूक्ष्म नियोजन त्यांनी केले आहे. या अनुषंगाने ग्रामीण पोलीस मुख्यालयात पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. एकिकडे हे काम सुरू असतांना त्यांनी महिला कर्मचाऱ्यांची नैसर्गिक विधीवरून होणारी कुंचबणा लक्षात घेतली. आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी महिला कर्मचारी, तक्रारदार यांच्यासाठी स्वतंत्र महिला स्वच्छतागृहाची निर्मिती केली. काही वर्षांत पोलीस विभागासह प्रशासकीय सेवेत महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा टक्का वाढत आहे.
ही कौतुकास्पद गोष्ट असली तरी महिलांनी आपल्याला मिळणाऱ्या मान सन्मानाचा योग्य आदर राखत काम करणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सरीता नरके
आज वेगवेगळे क्षेत्र महिला पादाक्रांत करत असताना मी महिला असल्याचे भांडवल करण्यापेक्षा आपण अधिकारी आहोत आणि सर्वाना सोबत घेऊन आपण काम केले तर पुढील प्रवास सोपा होऊन जातो. सोबतचे 43सहकारी सहकार्य करतात. यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपण काम केले, त्या विभागात माहिती स्वतहून देण्यासह अनेक नाविण्यपूर्ण प्रयोग करता आले..हे म्हणणे आहे म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सरीता नरके यांचे.
कोल्हापूर हे नरके यांचे मूळ गाव. पूर्वाश्रमीच्या सरीता पाटील यांना घरातून शिक्षणाला पाठबळ मिळाले. परीक्षांमध्ये ‘टॉपर’ राहुन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यश संपादन केले. शिवाजी विद्यापीठात टेक्सटाईल अभियांत्रिकी शाखेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या यशाने कॉपरेरेट क्षेत्राचे दरवाजे खुले झाले. एका कारखान्यात काम करताना त्यांना जपानमध्ये एका प्रकल्पाचे काम करण्यासाठी प्रस्ताव आला. मात्र त्या कालावधीत वडिलांनी तिन्ही भावडांना केवळ एकदाच एमपीएससीची परीक्षा देऊन पाहण्यास सुचविले. वडिलांच्या इच्छेचा मान राखत त्यांनी परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या. त्यांची अहमदनगर येथे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर भूसंपादन, अन्न व नागरी पुरवठा विभागात जिल्हा पुरवठा अधिकारी, नरेगा विभागाच्या उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा उपजिल्हाधिकारी, उपविभागीय प्रांताधिकारी (निफाड) आणि आता म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असा त्यांचा आजवरचा प्रवास आहे. प्रशासकीय सेवेत काम करण्याचा अनुभव इतर क्षेत्रापेक्षा छान असल्याचे त्या सांगतात. निवडणूक शाखेत काम करतानाचा अनुभव एकदम वेगळा आहे.
मतदान यादी तयार होण्यापासून मतदानापर्यंतच्या सर्व प्रक्रियेत अनेक आव्हाने असतात. लोकांच्या शंकाचे निरसन, प्रशासनावर निर्माण होणारे प्रश्नचिन्ह यामुळे सर्वात पारदर्शकता व सुसूत्रता असावी यावर लक्ष केंद्रीत केले. कोणी जाब किंवा प्रश्न विचारण्याच्या आधीच आपण त्यांच्या शंकाचे समाधान करणे गरजेचे आहे, अशी त्यांची भूमिका. २००५ मध्ये माहिती अधिकारांतर्गत सरकारी अधिकाऱ्यांना स्वतहून माहिती देणे बंधनकारक करण्यात आले. या अंतर्गत विभागाच्या योजना, त्यांचे स्वरूप, त्यांचे लाभार्थी होण्यासाठी काय करता येईल, आदींविषयीची माहिती पत्रकांद्वारे देण्यासाठी पुढाकार घेतला.
म्हाडा येथे अलीकडेच अभिहस्तांतरण प्रक्रिया कशी, त्याचे स्वरूप, त्याचे काम कसे चालते याविषयी पत्रके प्रकाशित करत त्यांचे छोटेखानी प्रदर्शन भरविले.