सिंहस्थाच्या पाश्र्वभूमीवर, महापालिकेतर्फे पंचवटी विभागात विविध ठिकाणी गुरूवारपासुन रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे हा परिसर वाहतुकीसाठी काम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त संदीप दिवाण यांनी दिली.

सिंहस्थ निधी अंतर्गत पंचवटीतील गणेशवाडी रस्ता देवी चौक ते गाडगे महाराज पुल, गाडगे महाराज पुल ते नेहरू चौक ते दहिपुल, महावीर स्वीट जिजामाता रोड टकले ज्वेलर्स पर्यंतचा रस्ता आणि टकले ज्वेलर्स ते रामसेतु पूल गोदावरी नदी पात्रापर्यंतचा रस्ता या चारही रस्त्यांचे क्रॉक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे हे मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. गणेशवाडी रस्ता देवी चौक ते गाडगे महाराज पुल या पहिल्या टप्प्याचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. तसेच सदरचा मार्ग हा ‘नो पार्किंग झोन’ म्हणुन घोषित करण्यात आला आहे. या मार्गावरून जाणारी वाहने गणेशवाडी देवी चौकाकडून गाडगे महाराज पुलाकडे जाणारी वाहतूक ही गाडगे महाराज पुलाकडे न जाता अमरधाम रस्त्याने जाऊन टाळकुटेश्वर पुलाजवळून उजवीकडे वळुन गौरी पटांगणमार्गे इतरत्र जाईल. नेहरू चौक गाडगे महाराज पुला मार्गे व पुलाखालून गणेशवाडीकडे जाणारी वाहतूक ही गणेशवाडीकडे न जाता गाडगेमहाराज पुला खालुन गौरी पटांगण मार्गे टाळकुटेश्वर पुलाकडे जावून डाव्या बाजुस वळून ती काटय़ा मारूतीकडे जाऊन इतरत्र जाईल. हे मार्ग काम पूर्ण होईपर्यंत उपरोक्त मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतील असे दिवाण यांनी सांगितले. हे र्निबध पोलीस दलाची वाहने, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू राहणार नाहीत.