सिडकोच्या आरक्षित वाहनतळाभोवती वाहनांची गर्दी
उरण तसेच जेएनपीटी परिसरातील अवजड वाहनांची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सिडकोने उरणमधील द्रोणागिरी नोडच्या औद्योगिक परिसरातील आरक्षित करण्यात आलेली प्रासंगिक वाहनतळांची कुंपणे दूर होऊन ती वाहनांसाठी कधी मोकळी होणार असा सवाल उरणकर उपस्थित करत आहे.
जेएनपीटी तसेच उरण परिसरातील बंदरावर आधारित उद्योगांमुळे मोठय़ा संख्येने अवजड वाहने रस्त्यावर असल्याने या परिसरात झालेल्या अपघातांत अनेकांचे बळी गेले आहेत.
तसेच अनेक जण जखमी झालेले आहेत. या पाश्र्वभूमीवर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघात होत असल्याने रस्तावरील वाहने हटवून या वाहनांसाठी वाहनतळ उभारण्याची तयारी जेएनपीटी व सिडकोने घेतली होती.
सिडकोने वसविलेल्या द्रोणागिरी नोडमध्ये सेक्टर १२ तसेच नवीन मर्क्‍स, तसेच काही ठिकाणी प्रासंगिक वाहनतळासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
या जागांना सिडकोने तारांची कुंपणे घातलेली आहेत. यामुळे वाहनतळाच्या सभोवताली वाहने उभी केली जात असल्याने या भागातील नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे सिडकोने हे वाहनतळ सुरू करावे अशी मागणी उरण सामाजिक संस्थेने केली आहे.