देवलापारजवळील पवनी येथे धनेश गुप्ता यांच्या खुनानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान, सायंकाळी धनेश गुप्ता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेला चोवीस तास लोटून गेले तरी एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही.  
मूळ देवलापार येथील रहिवासी धनेश बंसीधर गुप्ता (२७) हे वाहतूक व्यावसायिक असून त्यांचे पवनी येथे कार्यालय आहे. या कार्यालयाशेजारीच त्यांचे लहान बंधू स्मित बंसीधर गुप्ता यांचे मोबाईल शॉपीचे दुकान आहे. गुप्ता बंधूचे पवनी, चोरबाहुली आणि देवलापार येथे वर्चस्व आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास धनेश गुप्ता त्यांचे लहान बंधू स्मित यांच्या दुकानात बसले होते. याचवेळी सात ते आठ आरोपी त्यांच्या दुकानात आले. त्यापैकी एकाने पिस्तूलमधून गोळ्या झाडल्या. त्यात धनेश गुप्ता यांना तीन गोळ्या लागल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी स्मितने मोठय़ा भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात एक गोळी लागल्याने तोही जखमी झाला. यानंतर आरोपी फरार झाले. परिसरातील नागरिकांनी गुप्ता बंधूना लगेच नागपुरातील वोक्हार्टमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी तपासून धनेश गुप्ता यांना मृत घोषित केले. तर स्मितला दाखल करून घेण्यात आले असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे देवलापार पोलिसांनी सांगितले.
या भागात यादव आणि गुप्ता यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून शत्रुत्व निर्माण झाले आहे. मंगळवारी पवनी येथे बाजार भरतो. धनेश गुप्ता हे मंगळवारी दुपारी बाजारात गेले होते. यावेळी इंदलसिंग अशरफीलाल यादव आणि मलखामसिंग अशरफीलाल यादव यांच्यासोबत भांडण झाले. या भांडणात एकमेकाला पाहून घेण्याची धमकीही देण्यात आली. यानंतर गुप्ता यांनी देवलापार पोलीस ठाणे गाठून यादव बंधूविरुद्ध तक्रार नोंदवली. ही तक्रार केल्यामुळे यादव संतप्त झाले. त्यांनीही देवलापार पोलीस ठाण्यात जाऊन गुप्ता यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतरही यादव बंधूंचा राग शांत झाला नाही. त्यांनी बुधवारी दुपारी पवनी येथील गुप्ता यांच्या कार्यालयात जाऊन गोळीबार केला.
धनेश गुप्ता यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याची वार्ता पसरताच परिसरातील नागरिक संतप्त झाले. त्याचे पडसाद पवनीसोबतच देवलापार व चोरबाहुली परिसरात पडले. देवलापार पोलिसांनी याप्रकरणी इंदलसिंग अशरफीलाल यादव, मलखामसिंग अशरफीलाल यादव, तुभान इंदलसिंग यादव, जयसिंग अशरफीलाल यादव, प्रेमलाल अशरफीलाल यादव, प्रेमलाल अशरफीलाल यादव, सुनील यादव आणि निळू यादव यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.
 दुसऱ्या दिवशीही येथे तणावपूर्ण शांतता होती. घटनास्थळी ९ पोलीस निरीक्षक, १८ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांसह दोनशे पोलीस तैनात आहेत. प्रभारी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. दरम्यान, गुरुवारी दुपारी शवविच्छेदन केल्यानंतर धनेश गुप्ता यांचे पार्थिव त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
सायंकाळी धनेश गुप्ता यांच्या पार्थिवावर पोलिसांच्या बंदोबस्तात देवलापार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडली नाही. घटनेला चोवीस तास लोटून गेल्यानंतरही एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही. प्रकरण शांत होण्याची आम्ही वाट बघत आहोत. यानंतर आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे देवलापार पोलिसांनी सांगितले.