नववर्षांच्या स्वागतासाठी नागपूरकरांनी सुमारे तीन कोटींहून अधिक रुपयांचे मद्य रिचवले. पहाटे पाच वाजेपर्यंत दारूची दुकाने, बार आणि पब सुरू ठेवण्याचे परवानगी मिळाल्याने नागरिकांनी त्याचा चांगलाच फायदा करून घेतला. मावळत्या वर्षांला निरोप आणि नवीन वर्षांचे स्वागत महोत्सव हॉटेल चालकांसाठी पर्वणीच ठरली.
पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल व बार सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे अनेकांचे रात्री उशिरापर्यंत पाय थिरकले. शहरातील व शहराबाहेरील हॉटेलवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तसेच अंतर्गत सजावटही केली होती. काही हॉटेल्समध्ये संगीतमय कार्यक्रम, ऑक्रेस्ट्रा, डीजे आदींची व्यवस्था होती. सीताबर्डी, सदर आणि सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरील हॉटेल्समध्ये ग्राहकांसाठी डान्स फ्लोअरची व्यवस्था करण्यात आली होती. लुंगी डॉन्स, आता वाजले की बारा या गाण्यांना युवकांची पसंती होती. मध्यपींनी एकमेकांना शुभेच्छा देत नववर्ष महोत्सवाचा आनंद लुटला. तरीही यंदा तेथे फार प्रतिसाद नव्हता. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने तरुणाईंच्या उन्मादाला काहीसा लगाम लागला गेला. कडेकोट बंदोबस्तामुळे तरुण बाईक सुसाट वेगाने चालवू शकले नाहीत. अनेकांनी वाईन शॉपमधून मद्य खरेदी करून घरीच राहणे पसंत केले.
मद्य विक्रीस पहाटे पाचपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी मिळाली असली तरी अनेकांनी मध्यरात्रीनंतर फारवेळ दुकाने सुरू ठेवली नव्हती. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये, हाच यामागे उद्देश होता, असे नाग विदर्भ वाईन बार असोसिएशनचे पदाधिकारी प्रमोद जयस्वाल यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्य़ात १२५ वाईन शॉप, ५५० परमिट रूम, २२५ देशी दारूची दुकाने आहेत. काल तेथे नक्की किती विक्री झाली, हे सांगण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली. मात्र, दैनंदिनी विक्रीच्या तिप्पट विक्री झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तीन कोटी रुपयांहून अधिक मद्य विकले गेले असावे, असा अंदाज वर्तवण्यात आला. यंदा मद्य विक्रीत भरमसाठ वाढ झाल्याचे उत्पादन शुल्क विभागााच्या सूत्रांनी सांगितले. परराज्यातील बनावट मद्य जिल्ह्य़ात येऊ नये म्हणून ३१ डिसेंबरला सायंकाळीपासून तर पहाटेपर्यंत आठ पथके गस्त घालत होती.