आधारकार्डावरील नाव, पत्त्यामध्ये झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्याची, तसेच नवे आधारकार्ड वितरित करण्याची परवानगी असलेल्या दक्षिण मुंबईतील एकमेव कायमस्वरूपी आधारकार्ड नोंदणी केंद्र पालिकेच्या अनास्थेमुळे बंद करण्याची वेळ संस्थाचालकावर आली आहे. आजघडीला मुंबईत १५ लाख नागरिकांना आधारकार्ड मिळालेले नाही. या पाश्र्वभूमीवर हे आधारकार्ड नोंदणी केंद्र बंद पडल्यास विद्यार्थी, निवृत्त कर्मचारी यांच्यासह सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या अनेकांना आधारकार्ड मिळविण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आधारकार्डाशी संलग्न करण्यात येणार आहेत. अनेक बाबतीत आधारकार्ड सक्तीचे करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली शिष्यवृत्ती, अथवा स्वयंपाकाचा सिलिंडर असो वा निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन सर्वच बाबींसाठी सध्या आधारकार्ड गरजेचे बनले आहे. मात्र अशी परिस्थिती असताना मुंबईमधील तब्बल १५ लाख नागरिकांनी अद्यापही आधारकार्ड काढलेले नाही. लोकसभा, विधानसभा, पालिका निवडणुका जवळ आल्यानंतर आधारकार्ड काढण्यासाठी सर्वाची एकच धावपळ उडते. सध्या परीक्षांचा मोसम सुरू असून शाळा आणि महाविद्यालयीन प्रवेशाच्या वेळी आधारकार्डाची विचारणा होऊ लागली आहे.
पॅनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, वास्तव्याचा दाखला, गॅझेट, राजपत्र, ज्येष्ठ नागरिक कार्ड आदी शासनाच्या सेवा नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने महा ई-सेवा सुरू करण्याचा निर्णय आर. आर. सामंत आणि कंपनीने घेतला. त्याबाबतच्या सर्व परवानग्या मिळवून महा ई-सेवा केंद्र सुरू केले. आधारकार्ड नोंदणी केंद्र शोधणे आणि तेथे खेटे मारून आधारकार्ड मिळविणे म्हणजे नागरिकांसाठी एक डोकेदुखी बनली आहे. दक्षिण मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना आधारकार्ड मिळावे यासाठी आर. आर. सामंत आणि कंपनीने पुढाकार घेतला आणि संबंधित यंत्रणांशी  पत्रव्यवहार केला. यूआयडीने या कंपनीस आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरू करण्यास परवानगी देताच स्पँको या संस्थेच्या मदतीने याच दुकानात आधारकार्ड सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाली. मात्र केंद्र सरकारने आधारकार्ड केंद्रांवर नियंत्रण ठेवण्याची आणि त्यांना जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पालिकेवर सोपविली आहे. महा ई-सेवा केंद्रात नागरिकांची गर्दी होत असल्याने जवळच्या बंद पडलेल्या पालिकेच्या भीमाबाई राणे शाळेतील वर्ग खोली आधारकार्ड नोंदणी केंद्रासाठी मिळावी यासाठी कंपनीचे मनोज सामंत यांनी पालिकेशी पत्रव्यवहार केला. या शाळेतील तळमजल्यावरील सभागृह पालिका अधिकाऱ्यांनी उपलब्धही करून घेतली. त्यानंतर येथे आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरू झाले. आधारकार्ड नोंदणीबरोबरच नागरिकांना यापूर्वीच दिलेल्या आधारकार्डावरील नाव, पत्त्यामधील चुकांची दुरुस्ती करण्याचे अधिकारही या केंद्राला देण्यात आले आहेत. मात्र विधानसभा निवडणुका जवळ येताच आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरू असलेल्या सभागृहात निवडणुकीचे कार्यालय सुरू करण्यात आले. त्यामुळे जागेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे शाळेपाठीमागील माळी आणि रखवालदार यांच्यासाठी असलेल्या रिक्त जागेत आधारकार्ड नोंदणी केंद्र हलविण्याबाबत पालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासन देत या खोलीत आधारकार्ड नोंदणी केंद्र हलविण्यास अनुमती दिली. त्यानुसार हे केंद्र या खोलीमध्ये हलविण्यात आले. मात्र आता ही जागा रिकामी करण्याचा तगादा पालिका अधिकाऱ्यांनी संस्थाचालकांकडे लावला आहे. स्पँको संस्थेने जिल्हाधिकारी व माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांना पत्रव्यवहार करून हे केंद्र वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु पालिका अधिकारी ऐकायला तयार नाहीत.
सध्या आधारकार्ड मिळविण्यासाठी या आधारकार्ड नोंदणी केंद्रावर नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. अनेकांनी आधारकार्डासाठी अर्ज केले असून त्यांना नोंदणीसाठी पुढील दोन-तीन महिन्यांची वेळ देण्यात आली आहे. आता अचानक पालिका अधिकारी ही जागा रिकामी करण्याच्या मागे लागले आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार पालिका जागा देणार नसेल तर हे आधारकार्ड नोंदणी केंद्र बंद करावे लागेल, अशी खंत मनोज सामंत यांनी व्यक्त केली आहे. मात्र हे आधारकार्ड नोंदणी केंद्र बंद झाल्यास नागरिकांना वणवण करीत दूरवरचे नोंदणी केंद्र शोधत फिरावे लागणार आहे.
प्रसाद रावकर, मुंबई