गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘दाभोलकरांचे भूत’ या नाटकाचे प्रयोग करण्यासाठी रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाने परवानगी नाकारली आहे. या संदर्भात समिती स्थापन करून त्यावर चर्चा केली जाईल. समितीने  अहवाल दिल्यानंतर राज्य सरकारचा सांस्कृतिक विभाग या संदर्भात निर्णय घेईल, माहिती मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाटककार राम जाधव यांनी दिली.
रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाची गुरुवारी नागपुरात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ‘दाभोलकरांचे भूत’ या नाटकावर चर्चा झाली असून त्यामध्ये काही आक्षेपार्ह संवाद असल्यामुळे आणि समाजामध्ये त्याला वेगळे स्वरूप येऊ नये म्हणून तूर्तास परवानगी नाकारण्यात आली आहे. या नाटकासंदर्भात चर्चा करण्यासाठी नाटकाचे लेखक श्याम पेठकर आणि दिग्दर्शक हरिश इथापे यांना नाशिकच्या बैठकीला चर्चेसाठी बोलविण्यात आले होते. मात्र, ते बैठकीला आले नाहीत. नागपूरच्या बैठकीत या नाटकावर चर्चा झाली असून मंडळातील काही सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतल्यामुळे प्रथम या नाटकावर चर्चा केली जाईल आणि त्या संदर्भातील अहवाल राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर प्रयोग करायचे की नाही या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. एका प्रयोगासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, यापुढे त्या नाटकाचे प्रयोग जाहीर केले असले तरी पुढचे प्रयोग सादर करता नाही, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
नाटकांना परवानगी देताना त्या संबंधित नाटकात कुठल्याही जाती, धर्माबद्दल आक्षपार्ह असे किंवा समाजाचे स्वास्थ्य बिघडेल असे काही संवाद असतील तर अशा नाटकांना परवानगी दिली जात नाही. लेखकाला संहिता लिहिण्याचा अधिकार असला तरी त्याला परवानगी देण्याचा अधिकार मंडळाकडे आहे. संहिता परवानगीसाठी आली की सहा महिन्यांच्या आत त्याचा निकाल द्यावा लागतो, असेही जाधव म्हणाले. एखाद्या संहितेला परवानगी घ्यायची आहे तर यापुढे ती संहिता ऑनलाईन पाठविण्यात आली तर त्या ऑनलाईन परवानगी देण्याची सोय करण्यात आली आहे. वर्षभरात साधारणत: १२०० ते १५०० संहिता मंडळाकडे येत असतात. आतापर्यंत बहुतांश नाटकांना परवानगीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. काहींना दोन प्रयोगासाठी तर काहींना दहा प्रयोगासाठी. मंडळाची दर महिन्यात वेगवेगळ्या शहरात बैठक आयोजित केली जात असून प्रत्येक बैठकीत किमान १०० नाटकांना प्रमाणपत्र दिले जाते. शिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासंदर्भात आढावा घेतला जातो, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

रंगभूमी परीक्षण मंडळामध्ये ३२ सदस्य असून ते राज्यातील वेगवेगळ्या शहरातील आहेत. त्यात काही कलावंत आहेत. जे सदस्य साधारणत: सलग तीन बैठकींना अनुपस्थित असतील त्या सदस्यांबाबतचा अहवाल राज्य सरकारला पाठविला जातो आणि त्याचे सदस्यत्व रद्द केले जाते. प्रत्येक बैठकीमध्ये सर्वच सदस्य राहतील, असे नाही. सदस्यांवर कारवाई करण्याचा अधिकार हा राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाचा आहे. आम्ही त्या संदर्भात संबंधित सदस्यांबाबत अहवाल पाठवू शकतो, असेही जाधव म्हणाले.