मोमीनपुऱ्यातील एका दुकानाच्या खोलीत मोठय़ा प्रमाणात सापडलेला शस्त्रसाठा मुळात गुन्हेगारांना विकण्यासाठीच आणण्यात आला होता, हे स्पष्ट असले तरी यासंदर्भात ‘तपासाचा भाग’ एवढेच सांगत पोलिसांनी तोंड बंद ठेवल्याने पोलीस स्वत:च संशयाच्या जाळ्यात गुरफटू लागले आहेत.
मोमीनपुऱ्यातील आबिद जनरल स्टोअर्समध्ये मोठा शस्त्र साठा असल्याची गुप्त माहिती तहसील पोलीस ठाण्याचे हवालदार संजय आठवले यांना मिळाली. त्यांच्यासह हवालदार गंगाधर मुटकुरे, शिपाई चंद्रशेखर वैद्य, अब्दुल करीम, सुनील दिवटे, सचिन भिमटे, विश्वास वाघ आदींनी विविध प्रकारे खात्री करून घेतली. या माहितीच्या आधारे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अभिनाशकुमार, सहायक पोलीस आयुक्त पंजाब भगत, पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांच्या नेतृत्वाखालील तहसील पोलिसांनी बुधवारी रात्री त्या दुकानावर छापा मारला. दुकानामागील खोलीत तेथे तलवार, चाकू, कुकरी, हत्तीमार चाकू आदी दोनशेहून अधिक तीक्ष्ण व धारदार शस्त्रे तसेच देशी बनावटीचे तीन रिव्हॉल्वर तसेच ४.७ लाख रुपये सापडले. चीन व नेपाळमध्ये ही शस्त्रे तयार केली असल्याचा संशय आहे. दुकान मालक आरोपी मोहम्मद नईम जैजुल आबेदीन अन्सारी (रा. मोमीनपुरा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. हा शस्त्र साठा आरोपीने विकण्यासाठी आणला होता, मात्र तो ती लपून छपून विकत होता. मागील काही महिन्यांपासून तो मुंबईहून ती विकत आणत होता, एवढीच माहिती सहायक पोलीस आयुक्त पंजाब भगत व निरीक्षक जी.एम. मुजावर यांनी पत्रकारांना दिली.
आरोपीजवळ एक डायरी सापडली असून त्यात अनेक ग्राहकांची नावे आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शस्त्र साठा कशासाठी, कुठला कट तर आखला जात नव्हता ना, आदी अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी देण्याचे टाळले. आारोपी हा हृदयरोगी असून ९० टक्के ब्लॉकेजेस आहेत. परवाच त्याला रुग्णालयातून सुटी झाली असून त्याची बायपास शस्रक्रिया होऊ घातली आहे. त्यामुळे त्याची चौकशी करता आली नाही, असे खुद्द पोलिसांनी सांगितले. ‘हा तपासाचा भाग आहे त्यामुळे पोलीस कोठडीत ती मिळेल’ असे सांगत पोलिसांनी प्रश्नांना उत्तरे देणे टाळले. ‘सर्वच बाबी उघड केल्यास इतर आरोपी पळून जातील’ असे स्पष्टीकरण एका पोलीस अधिकाऱ्याने दिले. पोलीसच मुग गिळून बसल्याने हे संपूर्ण प्रकरणच संशयास्पद बनले असून पोलीसच संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत.