विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी युती, आघाडीसह विविध राजकीय पक्षांतील इच्छुकांची भाऊगर्दी वाढत असताना त्यातील काहींनी ‘अभी नही तो कभी नही’ अशी भूमिका घेऊन आपापल्या मतदारसंघात काम सुरू केले आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर वेळप्रसंगी पक्षसोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.
महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांबाबत असलेली अनिश्चितता आणि काँग्रेस- राष्ट्रवादीतील आघाडीबाबत सुरू असलेला घोळ या पाश्र्वभूमीवर इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत. अद्यापही राजकीय पातळीवरील चित्र अस्पष्ट असले तरीही ‘अभी नही तो कभी नही’ अशी भूमिका घेत यंदा निवडणूक लढवायचीच, असा निश्चय केलेल्या सर्व पक्षांतील इच्छुक प्रचाराला लागले आहेत.
महायुतीमधील पक्षामध्ये सुरू असलेला जागा वाटपाबाबत घोळ अजूनही सुटलेला नाही. युतीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले असले तरी महायुतीमध्ये असलेल्या अन्य पक्षांसाठी किती जागा सोडणार यासाठी श्रेष्ठींचा कस लागत आहे. विदर्भातील काही विद्यमान आमदारांनी दावेदारी केली असली तरी पक्षश्रेष्ठींनी मात्र काही नवीन चेहरे देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे त्यामुळे यावेळी काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये तर आघाडीच्या बाबतीतही अजूनही घोळ सुरू आहे, त्यामुळे उमेदवार ठरवण्यासाठी या दोन्ही पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
असे असले तरी प्रत्येक पक्षात यंदा कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच, पक्षाने उमेदवारी दिली तर ठीक, नाही तर अपक्ष असा निश्चय केलेल्या उमेदवारांची संख्या मोठी आहे. पक्षाने उमेदवारी नाकारली तर पर्याय हवा म्हणून इतर पक्षासोबतही बोलणी करून ठेवली आहे. बसप, रिपब्लिकन, मनसे हे पक्ष पर्याय म्हणून पुढे आले आहे.
नागपूर जिल्ह्य़ात १२ विधानसभा मतदारसंघ आहेत, शहरात सहा आणि ग्रामीण भागात सहा अशी त्यांची विभागणी झाली आहे. काँग्रेसचा विचार केला तर सर्वाधिक गर्दी पश्चिम, मध्य आणि उत्तर नागपुरात नागपुरात आहे. पश्चिम नागपुरात काँग्रेसचे माजी महापौर विकास ठाकरे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख यांनी उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी मिळो किंवा न मिळो निवडणूक लढवायचीच असा निश्चय करणाऱ्यांमध्ये या दोघांचा समावेश केला जातो. तशी तयारी त्यांनी दोन वर्षांपासून सुरू केली आहे. पश्चिमची जागा राष्ट्रवादीला सुटली तर ठाकरेंची अडचण आणि काँग्रेसला सुटली तर सलील यांची अडचण अशी सध्याची अवस्था आहे.
 भाजपकडून सागर मेघे यांचे पश्चिमधून नाव समोर आले. मात्र, सुधाकर देशमुख ती जागा सोडायला तयार नाहीत. सतीश चतुर्वेदी यांनी प्रारंभी पूर्वमधून उमेदवारी मागितली असताना त्यांनी दक्षिण नागपूरकडे  मोर्चा वळविला आहे. दक्षिण नागपुरात भाजपकडून छोटू भोयर, मोहन मते यांनी उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी मिळाली नाही तर छोटू भोयर निवडणूक लढणार असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. त्यांनी दोन वर्षांआधीपासून तयारी सुरू केली आहे. हिंगण्यातही जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे उमेदवारी मागितली असली तरी या जागेवर विद्यमान आमदार विजय घोडमारे यांनी दावा केला आहे. याशिवाय बसपा, शिवसेना, रिपब्लिकन पक्षातून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक असून त्यातील अनेकजण ‘आरपार’ची लढाई लढण्याच्या मनस्थितीत आहेत.