बाजारपेठेत डाळिंबाची आवक वाढत असल्याने जिल्ह्यात एकापाठोपाठ एक बाजार समिती डाळिंबाचे लिलाव सुरू करू लागली असताना दुसरीकडे बाजारात मिळणारा अत्यल्प भाव आणि तेल्या व मर या रोगांचे आक्रमण यामुळे डाळिंब उत्पादक पुरता हादरला असून याचा सर्वाधिक फटका मोसम परिसरास बसला आहे. औषधांवर भरमसाठ खर्च करून बागा जगविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांचा खर्चही वसूल होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेल्या आणि मर या रोगांमुळे हैराण झालेले अनेक शेतकरी संपूर्ण बाग नष्ट करू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत लोकप्रतिनिधींचे मात्र शेतकऱ्यांच्या या समस्येकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
जिल्ह्यात कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे) या भागात सर्वप्रथम देवळा आणि मालेगाव परिसरात डाळिंब बागा लावण्यास सुरूवात झाली. बाजारपेठेत मिळणाऱ्या चांगल्या भावामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास डाळिंब बागांनी चांगलीच मदत केली. त्यामुळे इतर पीक घेण्याऐवजी बहुतेक शेतकऱ्यांनी डाळिंब बागांना प्राधान्य दिले. त्यानंतर तेल्या आणि मर या रोगांमुळे देवळा तालुक्यातील अनेक डाळिंब बागा नष्ट झाल्या. मालेगाव तालुक्यातही त्याचा प्रादुर्भाव काही प्रमाणात झाला. या दोन तालुक्यातील डाळिंब बागा कमी होऊ लागल्या असताना सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांवर डाळिंबांनी  मोहिनी घातली. मोसम परिसरासह ज्यांना पाणी देणे शक्य होते असे बहुतेक शेतकरी डाळिंब बागांकडे वळले. डाळिंबांमुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने शेती करणे परवडू लागले. हाती पैसा खेळू लागला. ज्यांच्याकडे कित्येक वर्ष दुचाकीही नव्हती, अशा शेतकऱ्यांच्या दारापुढे चारचाकी वाहन उभे राहिले. डाळिंबामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर बदलला. परिणामी सर्वत्र डाळिंब बागा दिसू लागल्या. परंतु तीन वर्षांपूर्वी मोसम परिसरातही तेल्या आणि मर या रोगांचे आगमन झाले. या रोगाच्या कचाटय़ातून वाचलेल्या डािळबांना बाजारपेठेत बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने परिस्थितीत विशेष बदल झाला नाही. यंदा मात्र तेल्या, मर रोगाचे आक्रमण आणि बाजारपेठेत मिळणारा अत्यल्प भाव या दुहेरी संकटांना तोंड देता देता शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
तेल्या आणि मर या रोगांच्या प्रादुर्भावापासून मोसम परिसरातील एकाही बागेची सुटका झालेली नाही. कमीअधिक प्रमाणात या रोगांचे सर्वत्र थैमान आहे. शेतकऱ्यांनी अतिशय कष्टातून बागा जगवल्या आहेत. उन्हाळ्यात तर अनेकांनी प्रतिटँकर २०० ते ५०० रूपये खर्च करून पाणी आणून रोपांना दिले. कष्टाने जगविलेल्या बागा तेल्या रोगामुळे हद्दपार करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दुसरीकडे बाजारपेठेत विविध कारणांमुळे यंदा डाळिंबाला विशेष भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांपुढील संकटात वाढच झाली आहे.
चांगल्या फळांनाही प्रति कॅरेट १२०० पेक्षा अधिक भाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. मागील तीन वर्षांपासून तेल्याचा प्रादुर्भाव असलेल्या बागा शेतकरी तोडू लागले आहेत.
तेल्या रोगास तोंड देण्यसाठी बाजारपेठेत चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. बाजारपेठेतील परिस्थितीत लवकर बदल न झाल्यास मोसम परिसरातील डाळिंब बागांचे प्रमाण कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.