सध्याची तरुण पिढी सामाजिक व्यवस्था, संसाराचे ओझे, शिक्षण क्षेत्रातील असमाधानतेमुळे द्विधा मन:स्थितीत सापडून स्वत:च्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यातच गुरफटत गेली, याचे यथार्थ चित्रण ‘हाफ पॅन्ट’ या एकांकिकेतून नाटय़रूपात बघायला मिळाले.
भाजप सांस्कृतिक आघाडी व संजय भाकरे फाऊंडेशनच्यावतीने राहाटे कॉलनीतील साईकृपा मंगल कार्यालयात समीर विध्वंस लिखित ‘हाफ पॅन्ट’ ही एकांकिका सादर करण्यात आली. या एकांकिकेचे उत्कृष्ट सादरीकरण झाले. या नव्या उपक्रमाद्वारे जुने दिग्दर्शक व नवीन नाटय़ कलावंतांचा संगम घडून येत आहे. या एकांकितेचे दिग्दर्शन गजानन पांडे यांनी केले. नाटकाचा आत्मा ओळखून त्यानुसार येणारे अगदी बारीकसारीक तपशील प्रेक्षकांसमोर कसब त्यांनी दाखवून दिले आहे. गोंधळलेल्या मन:स्थितीत जगणारा ‘विशा’ सचिन गिरी या नवोदित कलावंताने जिवंत केला. आजच्या तरुणाईच्या मनातील अस्वस्थता परखडपणे मांडणारा विशा कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो. मुलाने सुसंस्कृत राहावे म्हणून आटापिटा करणारा एक अगतिक बाप मंगश बावसे या परिचित कलावंताने आपल्या दमदार संवादफेक, लयबद्ध हालचाल व सुस्पष्ट उच्चार यासह प्रसंगानुसार हावभावासह उभा केला. ‘माझ्यासारखा कारकून भिक्षुक नको होऊस बाळा’ हे सांगताना डोळ्यातून ओघळणारे अश्रू प्रेक्षकांनाही डोळ्याच्या कडा पुसायला भाग पाडतात.
स्वातंत्र्यलढय़ातील म्हातारा, शिक्षक व विशाचा बाप अशी तीन वेगवेगळ्या व्यक्तीरेखा त्या त्या वैशिष्टय़ांसह एकापाठोपाठ एक उभ्या करण्यात मंगेश बावसे हा यशस्वी झाला. सोबतच प्रियंका जशी, राहुल गणोरकर यांनीही त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय देऊन एकांकिकेला उंचीवर नेण्यात येश प्राप्त केले. सर्वच बाबतीत ताळमेळ जमून उत्कृष्ट अभिनय, कथानक, लय, ताल व सादरीकरणामुळे मंत्रमुग्ध झालेल्या प्रेक्षकांना या एकांकिकेने टाळ्या वाजविण्याचेही भान विसरायला लावले.
नागपूरच्या रंगभूमीला सोन्याचे दिवस दाखवित जुन्या दिग्दर्शकांनी परत रंगभूमीकडे वळून त्यांच्या अनुभवाचा फायदा नवीन कलाकारांना द्यावा, नाटकाचे तंत्र, अभिनय, तालीम, परफेक्शन या बाबी आवर्जुन कळाव्या, तंत्रशुद्ध नाटक सादर व्हावे, या हेतूने ज्येष्ठ रंगकर्मी संजय भाकरे व कुणाल गडेकर यांनी भाजप सांस्कृतिक आघाडी व संजय भाकरे फाऊंडेशनच्यावतीने दरमहा उत्कृष्ट दर्जेदार एकांकिका सादर करण्याची चळवळ सुरू केली आहे. याचे दुसरे पुष्प मुंबईतील चतुरंग प्रतिष्ठानमध्ये गाजलेली ‘हाफ पॅन्ट’ ही एकांकिका सादर करून गुंफले गेले. या एकांकिकेची निर्मिती कुणाल गडेकर व संजय भाकरे यांनी केली. या एकांकिकेचे सूत्रधार दिलीप देवरणकर व अनिता भाकरे असून संगीत केयूर भाकरे, प्रकाश योजना विशाल यादव, मकरंद भालेराव, नेपथ्य -सम्राज्ञी वैद्य, अपेक्षा गंधर्व यांचे आहे.