‘बेटो बचाओ बेटी पढाओ’ या उपक्रमांतर्गत शिक्षणाची गोडी निर्माण करण्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य पातळीवर प्रयत्न सुरू असताना नागपुरात मात्र समाजाने दुर्लक्षित केलेल्या एका वस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस कारवाईमुळे पाल्यांना ज्ञानार्जनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अभ्यासात हुशार असलेल्या या मुलींसाठी सामाजिक संस्था पुढे येईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देह विक्रय करणे हा गुन्हा असताना पूर्व नागपुरातील गंगा जमुना परिसरात अनेक वर्षांंपासून देहविक्रय सुरू आहे. या वस्तीमध्ये राहणाऱ्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे यादृष्टीने तेथील वारांगणांची मुले महापालिकेच्या चिंतेश्वर उच्च प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेत २०८ विद्यार्थी वेगवेगळ्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहे. गेल्या काही दिवसात ही संख्या मात्र ३० वर आली आहे. त्याचे कारण म्हणजे त्या भागात होणारी पोलिसांची कारवाई. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अभिनाशकुमार यांनी गेल्या काही दिवसांपासून या परिसरात धाडसत्र सुरू केले आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या वारांगणांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. चिंतेश्वर उच्च प्राथमिक शाळेत ८५ टक्के त्या वस्तीमधील मुले आहेत. त्यातील एका मुलीला शाळा सोडून कुठेही जाण्याची इच्छा नाही. कसेही करून मला शिकू द्या, अशी विनंती करीत आहेत. पोलिसांनी परिसर सोडून जाण्यास सांगितल्याने तेथील वारांगणा आपल्या मुलांना सोबत घेऊन जात असताना त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. २०८ मध्ये १०० मुली आणि ७० मुले हे वारांगणांचे आहेत. त्यातील अनेकांनी शाळेतील शिक्षकांना विनंती करीत आम्हाला शाळेत राहून शिक्षण घेऊ द्या, अशी विनंती केली आहे. त्यामुळे या वस्तीमधील मुलांच्या शिक्षणासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती शाळेतील अनेक शिक्षकांनी केली.