ऐरोलीमधील श्रीराम विद्यालयाच्या प्रशासनाने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पगारांची अंतरिम वाढ थकवल्याने संतप्त झालेल्या शिक्षक आणि पालकांनी मागील काही दिवसांपासून आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. शुक्रवारी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी चक्क रॅली काढत शालेय व्यवस्थापनेचा निषेध व्यक्त केला. दुसरीकडे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने या प्रश्नी तोडगा निघावा याकरिता शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे पालक संघटनेने धाव घेतली आहे.
दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच सुरू झालेले शिक्षकांचे बंड अद्यापही शमलेले नाही. शालेय व्यवस्थापन आपल्या भूमिकेवर ठाम असून शिक्षकांनीदेखील शालेय प्रशासनाच्या विरोधात दंड थोपटले आहे. त्यातच पालक संघटनादेखील शिक्षकांच्या मदतीला धावली आहे. त्यामुळे आंदोलन आणि अनेक बैठका यामुळे ऐरोलीतील श्रीराम विद्यालयातील वातावरण चांगलेच तापले आहे. श्रीराम विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या सेकंडरी विभागात ४४ शिक्षक विद्यादानाचे काम करतात. शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत या शाळेत हे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. शालेय प्रशासनाने या शिक्षकांना शालेय शिक्षक कर्मचारी वेतन नियमानुसार किमान पगार देणे आणि वार्षिक अंतरिम वाढ देणे अनिवार्य आहे. मात्र वर्षांकाठी शिक्षकांना अपेक्षित असणारा व वेतन प्रणालीनुसार पगार वाढ देण्याऐवजी केवळ ३०० ते ५०० रुपये कर्मचाऱ्यांना वाढ देऊन शालेय व्यवस्थापन शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसत आहे. पगार वाढीबरोबरच शिक्षकांना वेतन श्रेणीतील तसेच सुट्टयांची रक्कम दिली जात नाही. इतकेच नाही तर येथे कार्यरत असणाऱ्या लिपीक आणि प्रयोगशाळेचे शिक्षक व इतर शिक्षकांनादेखील जुन्या नियमावलीनुसार पगार दिला जातो. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी अनेकदा विचारणा केली असता व्यवस्थपनाने केवळ आश्वसनाची बोळवण केली. मागील आठ दिवसांचा कालवधी उलटून देखील व्यवस्थापनाने शिक्षकांच्या बाबत सकारात्मक भूमिका न घेतल्याने शुक्रवारी श्रीराम विद्यालय पालक संघटना आणि शालेय शिक्षक विद्यार्थ्यांने एक रॅली काढली. यावेळी शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी रॅलीत श्रीराम शाळेच्या प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने व्यवस्थापनाने शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी पालक संघटनेने केली आहे. पालकसंघटनेचे अध्यक्ष शीतल कोळी यांनी या प्रश्नी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लेखी निवेदन देत शालेय व्यवस्थापनाने सुरू केलेली कंत्राट पद्धत बंद करण्याची मागणी केली आहे. व्यवस्थापनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास उपोषणाचा इशारा पालक संघटना व इतर सामाजिक संघटनांनी शाळेला दिला आहे.