राज्यातील बहुतांश परिवहन उपक्रम तोटय़ात चालले आहेत. प्रवासी वाहतूक या एकमेव उद्देशाने चालवल्या जाणाऱ्या या उपक्रमांकडून टोल कंपन्या रग्गड टोलवसुली करीत असल्याने परिवहन उपक्रम चालवायचा की उपक्रमाचे पैसे केवळ टोलसाठी वापरायचे, या विवंचनेत परिवहन उपक्रम आहेत. त्यामुळे या उपक्रमांना टोलमधून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर हे परिवहन उपक्रम तोटय़ात सुरू आहेत. या उपक्रमांना समांतर वाहतुकीचा सर्वाधिक फटका बसत आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने उपक्रम चालवणे अवघड झाले आहे.
 डिझेल, सुटे भाग यांच्या वाढत्या किमतीचा भारही आहेच. कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाला तोटय़ातून वाचविण्यासाठी शासनाने टोलमधून मुक्त करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रम तोटय़ात सुरू आहे. उपक्रमाला दिवसाचे सात ते आठ लाख महसूल मिळणे आवश्यक असताना प्रत्यक्षात पाच लाखांचा महसूल मिळत आहे. वाढता खर्च, पगार खर्च याचा विचार करताना उपक्रम चालविणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत ऑगस्ट २००९ ते फेब्रुवारी २०१३ या कालावधीत थकवलेला २ कोटी ९२ लाखांचा टोल भरणा करण्याचे पत्र बी. के. प्लस या टोलवसुली कंपनीने कल्याण परिवहन उपक्रमाला पाठविले आहे, असे महाव्यवस्थापक सुधीर राऊत यांनी म्हटले आहे.