रेल्वेच्या तिकिटांच्या दरवाढीमुळे आधीच खिशाला चाट पडत असताना ठाणे-पनवेल मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या लबाडीमुळे पाच रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. पनवेलहून थेट ठाण्याकडे सुटणाऱ्या गाडीतून प्रवास करण्याची तुम्हाला इच्छा असेल आणि ती जर तुम्ही तिकीट विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्याला बोलून दाखवली नाही, तर तो तुमच्या हातात बिनधोकपणे १५ ऐवजी २० रुपयांचे तिकीट थोपवितो.
या छुप्या भाववाढीमागील कारणही रेल्वेकडे तयार आहे. पनवेल-ठाणे प्रवास जर तुम्ही सानपाडय़ामार्गे करत असाल तर २० रुपयांचे तिकीट आकारले जाते. मात्र पनवेल-नेरुळ-ठाणे अशा प्रवासासाठी १५ रुपयांचा तिकीट दर आहे. त्यामुळे ठाण्याचे तिकीट मागणाऱ्या प्रवाशांना सानपाडामार्गे प्रवासाचे २० रुपयांचे तिकीट आकारून रेल्वे कर्मचारी अकारण वाद ओढावून घेत असल्याचे चित्र सध्या सर्रासपणे दिसू लागले आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर नव्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पनवेल-सानपाडा-ठाणे हा वळणाचा मार्ग गावीही नसतो. त्यामुळे ठाण्याचे तिकीट काढताना ते नेरुळमार्गे मिळेल, याची दक्षता घेतली तरच तुमचे पाच रुपये वाचतील, अशी सध्याची परिस्थिती आहे. ठाणे-नेरुळ-पनवेल मार्गावर लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने जोर धरू लागली आहे. बेलापूरच्या पलीकडे खारघर, मानसरोवर, खांदेश्वर अशा पट्टय़ातील लोकसंख्येने सुमारे दहा लाखांचा आकडा ओलांडला असून पनवेल तर जंक्शन होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ठाणे-पनवेल मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा केव्हाच लाखांच्या घरात पोहचला आहे. ठाणे-तुर्भे-वाशी तसेच ठाणे-तुर्भे-नेरुळ या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्यामुळे गेल्या काही वर्षांत येथील लोकलच्या फेऱ्यांमध्ये सातत्याने वाढ करण्यात आली आहे. हा न्याय पनवेल मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र मिळालेला नाही. सध्याच्या घडीस ठाणे-पनवेल मार्गावर दर एका तासाने लोकल सोडण्यात येते. या मार्गावर नित्यनेमाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाडय़ांच्या वेळा पक्क्य़ा ठाऊक असतात. मात्र मधल्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सानपाडामार्गे इच्छितस्थळी पोहोचण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ठाणे-सानपाडा-पनवेल किंवा नेमका उलटा प्रवास करायचा असेल तर २० रुपयांचे तिकीट आकारले जाते. मात्र ठाणे-नेरुळ-पनवेल अशा प्रवासासाठी १५ रुपयांचा तिकीट दर आहे. दर एका तासाने सुटणाऱ्या लोकलची वाट पहण्याऐवजी सानपाडामार्गे प्रवास करण्याची तयारी ठेवणाऱ्या प्रवाशांना २० रुपयांचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र तिकीट खिडक्यांवर बसणारे कर्मचारी चालाखीने नेरुळमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही २० रुपयांचे तिकीट थोपवीत असल्यामुळे तिकीट खिडक्यांवर अकारण वाद निर्माण होत असल्याचे चित्र वारंवार दिसू लागले आहे.