उरण तालुक्यातील चिर्ले परिसरातील वन्यजीव मित्र आनंद मढवी यांना मांडूळ (दुतोंडय़ा) हा दुर्मीळ जातीचा साप आढळून आला असून त्याची वन विभागाकडे नोंद करून त्याला पुन्हा एकदा जंगलात सोडण्यात येणार आहे. या सापाची लांबी ४४.५ इंच इतकी असून यापूर्वी उरण विभागात ४५ इंचांचा साप सापडला होता.
मांडूळ जातीच्या सापाबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. याच गैरसमजातून त्याचा मांत्रिकांकडून वापर केला जातो. त्यासाठी या सापाची तस्करीही केली जाते. त्यामुळे या सापाला लाखो रुपयांची किंमत आहे. साधारणत: मातीखाली राहणारी ही सापाची जात असून गांडूळ, किडे हे त्याचे प्रमुख अन्न आहे. त्याचप्रमाणे हा साप विदर्भातील भुसभुशीत मातीतच आढळतो.
मात्र तस्करीच्या निमित्ताने आणण्यात आलेले साप या भागात आढळून येत असल्याने या विभागात दुर्मीळ जातीच्या सापांची तस्करी केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.