राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या होणाऱ्या कुलगुरूंच्या जाहिरातीचे कवित्व कायम असून त्यावरील चर्चेने विद्यापीठच नव्हे तर विद्यापीठाबाहेरही चर्चेला ऊत आला आहे. नागपूर विद्यापीठाला विधिसभेत सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले खरे पण, अनेक सदस्यांचे अज्ञानही उघड झाले असून विद्यापीठाच्या संवादीकडे संशयाची सुई फिरते.
समितीवर कामे करणारे कोण आहेत, त्यांची आताची स्थिती काय, समितीची स्थापना कोणी केली, विद्यापीठाशी त्यांच्या संबंध कोठे येतो, याविषयी अनेक विधिसभा सदस्यांचे अज्ञान उघड झाले. केवळ वर्तमानपत्रांवर विसंबून राहणाऱ्या ‘व्होकल लिडर्स’ यांनी कुलगुरूपदासाठी १३८ अर्ज आल्याचे ठासून सांगितले. विद्यापीठाला प्रश्न विचारून प्रशासनाला भंडावून सोडलेल्या सदस्यांना कुलगुरू, प्रकुलगुरू आणि कुलसचिव यांनी वेगवेगळ्याप्रकारे माहिती देऊन विद्यापीठाची भूमिका, विद्यापीठाच्या मर्यादा, लायझनिंग ऑफिसरने (संवादी) बजावलेली भूमिका आणि ‘निकिता मीडिया’ या जाहिरात कंपनी विषयीची माहिती सांगूनही सदस्यांचे पाहिजे तसे समाधान झाले नाही. समितीवरील खर्च विद्यापीठालाच करावा लागतो. तसा यावेळीही विद्यापीठालाच करावा लागणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ असली तरी होणारा खर्च विद्यापीठाच्या सर्वसाधारण निधीतून होणार असून तो पैसा विद्यार्थ्यांचा आहे या सदस्यांचा भावनाही तेवढय़ाच महत्त्वाच्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे दोन दिवसांच्या विधिसभेतील कामकाजाचे धावते वर्णन काही विधिसभा सदस्यांच्या माध्यमातून समितीपर्यंत पोहोचवले जात होते. यासर्व घडामोडींमध्ये संवादी काहीतरी गडबड करतोय, अशी शंका समितीला वाटते. कारण ‘निकिता’ची माहिती संवादीनेच समितीपर्यंत पोहोचवली आहे. विद्यापीठाने कुलगुरू निवड समितीवरील खर्चासाठी केलेली तरतूद आणि इतर बाबींची माहिती समितीला योग्य वेळी सांगण्याचे कौशल्य संवादीला साधता आलेा नसल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते. गेल्या १०-१२ वर्षांपासून विद्यापीठ निकितालाच जाहिरात देत आल्याचे उपकुलसचिव प्रशांत मोहिते यांनी सांगितले. ९१ लाखाची जाहिरात छापन्यापूर्वी निकिताने एका शब्दानेही विद्यापीठाला माहिती देऊ नये यावरून विद्यापीठावरील अविश्वासच स्पष्ट होतो. निकिताची बिले तर विद्यापीठाने थकित ठेवलेली नाहीत ना, अशीही शंका उपस्थित होते. एकाच प्रश्नावर तासभर चर्चा झाली. कुलगुरूंच्या मासिक वेतनाचाही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. कुलगुरूंना अंदाजे १ लाख ५५ हजार ५०० रुपये वेतन मिळते, असे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांच्यावरील खर्चाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगण्यात आले आहे.