संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या पुनर्मूल्यांकनाच्या निकालात ५६१ परीक्षार्थ्यांपैकी तब्बल ३१५ विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झाल्याचा प्रकार समोर आला असून त्यामुळे पेपर तपासणीच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
विद्यापीठात पुनर्मूल्यांकनाचे निकाला जाहीर होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शनिवारी बी.ई., बी.फार्म, बी.सी.ए., बीएससी, एलएलएमच्या पुनर्मूल्यांकनाचे निकाल घोषित करण्यात आले.
या परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांविषयी असमाधानी असलेल्या सुमारे ५६१ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर केले होते. या विद्यार्थ्यांपैकी ३१५ विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झाला असून त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे गुण वाढले गेले आहेत. पूनर्मूल्यांकनातून अनेक विद्यार्थ्यांना समाधान लाभले असले, तरी परीक्षार्थ्यांच्या उत्तरपत्रिका अचूकपणे तपासल्या जातात का, हा प्रश्न चर्चेत आला आहे. हलगर्जीने पेपर तपासणी केल्याने कित्येक विद्यार्थ्यांचे नुकसान होते.
अमरावती विद्यापीठात पुनर्मूल्यांकनाची सोय असली, तरी त्यात वेळ आणि पैसा खर्च होतो. गेल्या वर्षीही विद्यापीठात पुनर्मूल्यांकनाचा घोळ समोर आला होता. बीबीए अभ्यासक्रमाच्या निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झाल्याचे निदर्शनास आले होते. बीबीए अभ्यासक्रम राबवणाऱ्या पन्नासवर महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ मान्यताप्राप्त प्राध्यापकच नसल्याचे गंभीर चित्र ‘लोकसत्ता’ने उजेडात आणले होते.
एम.ए.च्या काही विद्यार्थ्यांचे गुण पन्नास टक्क्यांहून अधिक वाढल्याचे निकालातून स्पष्ट झाले होते. १६ टक्क्यांपेक्षा जास्त गुणवाढ झाली, तर अशा उत्तरपत्रिकांची दुसऱ्या परीक्षकांकडून पुन्हा पुनर्मूल्यांकन करून घेण्याची पद्धत विद्यापीठात आहे, पण २५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण वाढल्याचे दिसून आल्यास अशी प्रकरणे गैरप्रकार प्रतिबंधक समितीकडे (३२ (६),(अ) समिती) पाठवली जातात. उत्तरपत्रिकांच्या तपासणीच्या वेळी पूर्णवेळ प्राध्यापक त्याकडे पाठ फिरवतात. त्यामुळे तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांकडून पेपर तपासणीचे काम करून घ्यावे लागते. त्याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसतो. गेल्या वर्षीही पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. या संख्येत वाढच होताना दिसत आहे.
गेल्या वर्षी अभियांत्रिकीच्या पेपर तपासणीच्या वेळी परीक्षकच न मिळाल्याने निकाल विलंबाने जाहीर झाला. निकालातील त्रुटींचे वाढते प्रमाण हा विद्यापीठासाठी आता चिंतेचा विषय ठरू लागला आहे. उत्तरपत्रिका सोडवल्यानंतर विद्यार्थ्यांना अपेक्षित गुणांचा अंदाज येतो. तितके गुण न मिळाल्या त्याला पुनर्मूल्यांकनाची पायरी चढावी लागते. त्यात खर्च होणारा वेळ, श्रम आणि पैसा यांचे मूल्यांकन कोण करणार, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालक आता विचारू लागले आहेत. अनेक विद्यार्थी अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळूनही पुनर्मूल्यांकनाच्या वाटय़ाला जात नाही. अनेक विद्यार्थ्यांचे त्यामुळेही शैक्षणिक नुकसानही होते.
स्पध्रेच्या काळात एकेक गुणाला महत्त्व असताना मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांनी जबाबदारीने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.