राज्य सरकारने राज्यातील स्वस्त धान्य दुकानांतील धान्याचे वाटप करण्यासाठी ऑनलाइन रेशनिंग कार्डची घोषणा केली असून त्याची नोंद उरण तहसील कार्यालयातही सुरू आहे. या नोंदी करीत असताना उरणमधील एका गावातील रेशनिंग कार्डमध्ये एका कुटुंबातील सर्वाचीच जन्मतारीख एकच असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन रेशनिंग कार्ड हाती पडण्यापूर्वीच चुकांच्या जंजाळात सापडल्याचे दिसते.
बायोमेट्रिक पद्धतीने रेशनिंगवरील धान्याचे वाटप करून धान्यपुरवठय़ातील भ्रष्टाचार बंद करण्याचा उद्देश राज्य सरकाने ठेवला आहे. त्याकरिता पुरवठा विभागाकडून रेशनिंग दुकानदारांमार्फत नागरिकांचे बी फॉर्म भरून घेण्यात आले. राज्यातील रायगडसह कोकणातील तीन जिल्ह्य़ांत प्रयोगिक तत्त्वावर ऑनलाइन रेशनिंग कार्ड तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी एक विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. बी फॉर्म भरत असतांना कुटुंबातील व्यक्तींची संपूर्ण माहिती भरून दिली आहे. असे असतानाही खोपटे धसाखोशी पाडा येथील संजय ठाकूर व पंढरीनाथ ठाकूर यांच्या कुटुंबीयांच्या जन्म वर्षांची नोंद योग्य असली तरी या कार्डात त्यांच्या घरातील सर्वाच्याच जन्मतारखा या १ जानेवारी असल्याची नोंद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या कार्डाच्या खाली ही सर्व माहिती कुटुंबधारकाने दिली असून ती चुकीची असल्यास तोच जबाबदार असल्याचा उल्लेख असल्याने कार्डधारकाने शंका व्यक्त केली आहे.
या संदर्भात उरण तहसीलचे पुरवठा अधिकारी रत्नाकर शिरसाठ यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रायोगिक तत्त्वावर होते. या कुटुंबाची माहिती तपासून त्यातील चुकीची दुरुस्ती करून सुधारणा करण्यात येईल व यापुढे अर्ज भरून घेताना त्याची काळजी घेतली जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.