महाराष्ट्रातील पर्यटन उद्योगाची वाढ आणि प्रचार व प्रसारासाठी शालेय वह्य़ांच्या पृष्ठभागावर राज्यातील पर्यटन स्थळांचे चित्र प्रसिद्ध करण्याची सूचना ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ नाशिक (तान) या संघटनेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.
दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थ्यांसाठी वह्य़ांची गरज भासत असते. या वह्य़ांच्या पृष्ठभागावर कार्टून्स किंवा काही निसर्गचित्रे प्रसिद्ध केलेली असतात. काही वह्य़ांना थेट कव्हर घातलेले असते. विद्यार्थ्यांच्या सामान्यज्ञानात त्यामुळे कोणतीच भर पडत नाही. तसेच महाराष्ट्राविषयी त्यांना त्याद्वारे कोणतीही माहिती मिळत नाही. परंतु या वह्य़ांचा महाराष्ट्रातील पर्यटनवाढीसाठी उपयोग करून घेणे शक्य असल्याचे तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. शासकीय मालकीच्या वह्य़ांवर किंवा खासगी कंपनीच्या वह्य़ांवर शासनाने महाराष्ट्रातील गडकिल्ले, सागर किनारे, तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळांची चित्रे प्रसिद्ध केल्यास आणि वहीच्या आतील बाजूस त्या संदर्भातील माहिती देणे बंधनकारक केल्यास विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच महाराष्ट्रातील पर्यटनाविषयी माहिती मिळू शकेल. त्यामुळे या संदर्भात कार्यवाही करण्याची मागणी भालेराव यांनी तावडे यांना केली आहे.
 तावडे यांनी ही स्वागतार्ह सूचना असल्याचे नमूद करत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली.