रेल्वेतील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ‘नॅशनल रेल्वे मजदूर युनियन’तर्फे महिला अलीकडेच स्वसंरक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. ‘एनआरएमयू’चे महामंत्री वेणू नायर यांच्या पुढाकाराने आयोजिण्यात आलेल्या या शिबिरात महिलांना स्वयंरक्षणाचे धडे देण्यात आले. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जुजुत्सू आणि ज्युडो या क्रीडाप्रकारांत पदके मिळवलेले विक्रीकर विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश दळवी यांना आमंत्रित करण्यात आले होते. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम प्रमुख पाहुणे म्हणून या शिबिरासाठी उपस्थित होते.
महिलांवरील हल्ल्यांत वाढ झाल्याच्या पाश्र्वभूमीवर रेल्वेतील महिला कर्मचाऱ्यांनी स्वयंसंरक्षणासाठी सिद्ध असावे, यादृष्टीने नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने ‘सक्षम नारी, समर्थ नारी’ अशी हाक दिली. शिबिराचे आयोजन या नाऱ्याला साजेसेच होते. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील सभागृहात हे शिबीर पार पडले.अचानक समोरून हल्ला झाल्यास त्याचा प्रतिकार कसा करावा, मागून हल्ला झाल्यास त्याला कसे उत्तर द्यावे, प्रतिहल्ला चढवून हल्लेखोराला नामोहरम कसे करावे, याच्या छोटय़ाछोटय़ा क्लृप्त्या उपस्थित महिलांना प्रात्यक्षिकांसह दाखवण्यात आल्या. या शिबिरासाठी  मुकेश निगम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एनआरएमयुचे महामंत्री वेणू नायर, अरुण मनोरे, विनायक शेवाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिराचे आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा शेवाळे यांनी केले.