वेगवेगळ्या माध्यमातून देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आणून सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या हाती सत्ता देणार काय, असा प्रश्न उपस्थित करत निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या कृतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार हल्ला चढविला.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ गुरूवारी घोटी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकास कामांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी धोरणांची अंमलबजावणी करत उत्पादन क्षमता वाढविण्यात आली. दुसरीकडे पिकाला योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तसेच हे अन्न देशातील ६० कोटी जनतेपर्यंत कमी दरात जावे यासाठी अन्न सुरक्षा योजना अंमलात आणली असे त्यांनी सांगितले. गुजरातच्या विकासाचा डंका पिटणारे मोदी सारे श्रेय स्वत:कडे घेत आहेत. मात्र त्यातील जनतेचा सहभाग ते टाळत आहे. माधवराव सोळंकी, चिमनभाई पटेल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात गुजरातचा विकास दर १६ ते १७ टक्के होता. मोदींच्या काळात तो ८ ते ९ टक्क्यांवर आहे. अशा व्यक्तीच्या हातात देशाची सत्ता द्यायची का, असा प्रश्नही पवार यांनी केला. पंतप्रधान होणाऱ्या व्यक्तीने सर्वधर्म निरपेक्षता बाळगणे गरजेचे असताना मोदींवर धर्माध असल्याचा शिक्का आहे. त्यांच्या हाती सत्ता गेल्यास देशाचे चित्र भेसूर असेल, असा इशाराही त्यांनी दिला. देशाच्या तसेच जिल्हाच्या विकासासाठी जनतेने भुजबळ यांच्या पाठीशी रहावे, असे आवाहन पवार यांनी केले. सभेस खा. समीर भुजबळ, ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील, माजी महापौर दशरथ पाटील आदी उपस्थित होते.