सतत वर्दळ असलेल्या दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी मॉर्निग वॉक- इव्हनिंग वॉकसाठी येणाऱ्या हजारो लोकांना मोकळी हवा देणारे, शेकडो खेळाडू घडवणारे शिवाजी पार्क गेल्या काही वर्षांत धुळीचे केंद्र बनले आहे. शिवाजी पार्कचे सौंदर्यीकरण करण्यासाठी वापरली जाणारी लाल मातीच अयोग्य व्यवस्थापनामुळे समस्या ठरली आहे. शिवाजी पार्कबाबत हे ऐकून धक्का बसू शकतो, मात्र नियमितपणे या मैदानात येणाऱ्यांना नाकातोंडात धूळ जाण्याचा अनुभव नवा नाही. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा या मैदानात आणखी काही ट्रक माती टाकली जाणार असून त्याचा परिणाम शिवाजी पार्कप्रेमींनाच भोगावा लागेल.  
दर पावसाळ्यात शिवाजी पार्कची पार दुर्दशा होते. पावसाच्या पाण्याने होणारा चिखल, पाण्यासोबत वाहून जाणारी माती यामुळे अवकळा येते. हे कमी की काय, पण गणेश विसर्जनासाठी येणारे शेकडो ट्रक, टेम्पोसाठी मैदानाचाच वाहनतळ म्हणून वापर होतो. या गाडय़ांच्या वाहतुकीने आधीच चिखलाने भरलेल्या मैदानाची पातळी असमान होते. पावसाळ्यानंतर मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी मग पिचवर माती टाकून नीट केले जातात. आजूबाजूचे खड्डे मातीने बुजवले जातात. २६ जानेवारी रोजी केल्या जाणाऱ्या परेडसाठी पुन्हा मातीचे ट्रक मैदानात येतात. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठीही मैदान पुन्हा मातीने सजवले जाते. हे सर्व करण्यामागचे हेतू चांगले असले तरी त्याचे परिणाम मात्र या परिसरात सतत येणाऱ्यांना व राहणाऱ्यांना भोगावे लागत आहेत, असे डॉ. सुहास पटवर्धन यांनी सांगितले. शिवाजी पार्कसमोर असलेल्या दीक्षित निवासमध्ये ते राहतात. शिवाजी पार्कमधून उठणाऱ्या या धुळीच्या लोटांचा मागोवा ते गेली दोन वर्षे घेत आहेत. ही धूळ नेमकी कुठून येते, त्याची कारणे व उपाय घेऊन ते प्रशासनाकडे फेऱ्या मारत आहेत.
वातावरणातील सततची धूळ मैदानात फिरायला आलेल्या लहानग्यांच्या नाकातोंडात जाते. खेळाडूंना या धुळीचा त्रास होतो. मैदानाभोवती फेऱ्या मारणाऱ्यांनाही नुसत्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या सूक्ष्म धूलिकणांचा त्रास होतो. शिवाजी पार्क परिसरात घरे असणाऱ्यांना तर २४ तास याच हवेत श्वास घ्यावा लागतो. या इमारतीच्या भिंतीवर साचणारा धुळीचा थर या समस्येचे गांभीर्य अधोरेखित करतो, असे पटवर्धन म्हणाले.     

शिवाजी पार्क
आरोग्याला हितकारक की त्रासदायक?
(पूर्वार्ध)
आरोग्यावर परिणाम
या धूलिकणांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. माहीमच्या पी. डी. हिंदुजा रुग्णालयातील श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अशोक महाशूर यांच्या म्हणण्यानुसार सूक्ष्म धूलिकणांमुळे श्वसनविकारांपासून फुप्फुसाच्या कर्करोगापर्यंत आजार होऊ शकतात. १० मायक्रोमीटर आकाराचे (केसांच्या टोकाचा व्यास ७० मायक्रोमीटर असतो) धूलिकण नैसर्गिक संरचनेमुळे शरीरात प्रवेश करू शकत नाही. २.५ ते पाच मायक्रोमीटरचे कण श्वसननलिकेच्या वरच्या भागात म्हणजे नाक, कान, घसा, स्वरयंत्र यांना अपाय करतात. यामुळे डोळ्यांची आग होणे, खोकला, सर्दी, शिंका येणे असे परिणाम दिसतात. वारंवार धूलिकण शरीरात जात राहिले, तर श्वसननलिकेची क्षमता कमी होऊन विषाणू संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते. सततचा ताप, न्यूमोनिया, क्षयरोग, सायनस इ. आजार होतात.
२.५ मायक्रोमीटरपेक्षा आकाराने कमी असलेले धूलिकण हवेत अनेक आठवडे राहू शकतात. आकाराने अगदी लहान असल्याने हे कण फुप्फुसात प्रवेश करतात. श्वसननलिका व फुप्फुसाला हानी पोहोचवून दमा, ब्राँकायटिस ते अगदी कर्करोगापयर्र्त आजार होण्याची शक्यता बळावते. लहान मुले व वयोवृद्धांची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांच्यावर हा परिणाम अधिक होतो, तर निरोगी व्यक्तींची प्रतिकारशक्ती यामुळे कमी होत जाते.