राज्यात अनेक ठिकाणी संततधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत येणाऱ्या भाज्यांची आवक घटली असून आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास भाज्यांचा तुटवडा भासू लागणार आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्यास सध्या अवाक्यात असणाऱ्या भाज्यांचे दर वाढण्याची भीती भाजी बाजारातील व्यापारी व्यक्त करीत आहेत. संततधार पावसामुळे घाऊक बाजारात खराब भाज्या येत असून त्यामुळे त्याला उठाव नसल्याचे भाजी बाजार संचालक शंकर पिंगळे यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव आणि त्यानंतर येणाऱ्या पितृपंधरवडय़ात भाज्यांची मागणी वाढते. त्यामुळे पुरवठा घटला तर साहजिकच भाज्यांचे भाव वाढणार आहेत.
मुंबईला भाजीपुरवठा करणाऱ्या पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्य़ांत सध्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे भाज्यांचे मोठे नुकसान होऊ लागले असून शेतात भाजी सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकरी सध्या आहे तशी भाजी काढून बाजारात पाठवीत आहेत. सोमवारी ६५० ट्रक टेम्पो भरून भाजी तुर्भे येथील घाऊक बाजारात आल्याची नोंद आहे. मात्र मंगळवारी भाजीचे केवळ ३५० ट्रक टेम्पो बाजारात आले. दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे ही आवक घटू लागली असून पावसाने लवकर उघडीप न घेतल्यास पुढील १५ दिवसांत भाज्यांचा फार मोठा तुटवडा जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतही पावासाचा जोर जास्त असल्याने ठिकठिकाणी बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी अघोषित सुट्टी घेतल्याने भाजी बाजारात मालाला उठाव नसल्याचे पिंगळे यांनी स्पष्ट केले. मुंबईत किरकोळ विक्रेत्यांची संख्या जास्त असल्याने या फेरीवाल्यांनी बाजाराकडे पाठ फिरवल्यास त्याचा फार मोठा परिणाम घाऊक बाजारावर होत असल्याचे दिसून येते. याशिवाय संततधार पावसातच शेतकऱ्यांनी भाजी काढून मुंबईत पाठविल्याने तिची गुणवत्ता ढासळली आहे.

कांदा स्थिरावला
संततधार पावसामुळे भाज्यांचे गणित कोलमडून जाण्याची शक्यता निर्माण झालेली असताना कांदा मात्र १५ ते २२ रुपये दरम्यान स्थिरावला आहे. गणेशोत्सव सरल्यानंतर बाजारात नवीन कांदा येणार असल्याने हे भाव आणखी खाली येण्याची शक्यता कांदा-बटाटा बाजाराचे संचालक अशोक वाळुंज यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूत कांद्याचा समावेश करण्याची दिलेली मात्रा व्यापाऱ्यांवर चांगलीच लागू पडली असून साठेबाजार करणाऱ्यांवर त्यामुळे र्निबध आले आहेत. एकंदरीत जुन्या आणि नवीन कांद्याचे प्रमाण वाढणार असल्याने दिवाळीत कांदा स्वस्त खाण्यास मिळणार असल्याचे दिसून येत आहे.