एमआयडीसीच्या गलथान कारभारामुळे घणसोली, गोठिवली, रबाले, नोसिल नाका, तळवली गावमधील रहिवाशांना अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
महावितरणकडून आठवडय़ातील दर शुक्रवारी शटडाऊनमुळे विद्युतपुरवठा खंडित करण्यात येतो. त्यामुळे शनिवारी व रविवारी पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अडथळे निर्माण होत असतानाच  एमआयडीसीची जलवाहिनी मागील आठवडय़ात फुटल्यामुळे त्याचाही परिणाम पाणीपुरवठय़ावर होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी घणसोलीमधील लोकप्रतिनिधींनी एमआयडीसी उपकार्यकारी अभिंयता आर. जी. राठोड यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. एमआयडीसी प्रशासनाकडून अनियमित पाणीपुरवठय़ाचा प्रश्न निकाली काढला नाही, तर एमआयडीसीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा घणसोलीकरांनी दिला आहे. या संदर्भात एमआयडीसीचे उपकार्यकारी अभिंयता आर.जी. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मागील आठवडय़ात एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जलवाहिन्यांचे दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, काम पूर्ण होताच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.