गेल्या काही वर्षांत थॅलेसेमिया आणि सिकलसेल रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असताना त्यासाठी रक्ताची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे रक्तदानाविषयी समाजात जागृती व्हावी, या उद्देशाने लाईफलाईन या रक्तपेढी अंतर्गत गुरुदेव फाऊंडेशनद्वारा सिकलसेल-थॅलेसेमिया प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन २३ नोव्हेंबरला अभिनेत्री जुही चावला यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शिवाय यावेळी काढण्यात येणाऱ्या जनजागृती मिरवणुकीमध्ये त्या सहभागी होणार असल्याची माहिती लाईफ लाईन ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. हरीश वरंभे यांनी दिली.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात सायंकाळी ६ वाजता कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, सायंकाळी ५ वाजता लोकमत चौक ते व्हेरायची चौक दरम्यान मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीला अमृता देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, अनिल सोले, चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, समीर मेघे, सुनील केदार आणि बच्चू कडमू, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, पोलीस आयुक्त के. के. पाठक, रवींद्र कदम, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अशोक गिरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जवळपास तीस संस्था या उपक्रमात सहभागी होणार आहे.
थॅलेसेमिया हा अनुवांशिक व असाध्य आजार असून ज्यामध्ये रक्तनिर्मिती बाधित असते. या आजाराने त्रस्त असलेल्या मुलांना त्याच्या वयाच्या पहिल्या वर्षांपासून रक्तपुरवठा करावा लागतो. लाईफलाईन रक्तपेढीने आतापर्यंत आजाराने ग्रस्त असलेल्या ८८ मुलांना दत्तक घेतले व त्यांना मोफत रक्तपुरवठा करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या मुलांना विशेष रक्तपुरवठा केला गेला तर ते साधारणपणे ५० ते ७० वषार्ंपर्यत जीवन जगू शकतात. मात्र विशेष रक्त पुरवठा करणे महाग असल्यामुळे हे रक्तपेढीच्या आर्थिक क्षमतेपलिकडे आहे. त्यामुळे अशा विशेष रक्तपुरवठा करण्यासाठी गुरुदेव फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून सिकलसेल आणि थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी ती काम करणार असल्याचे वरंभे यांनी सांगितले.