अलीकडच्या काळात आलेल्या ८ इंची टॅब्लेटस्च्या नव्या ट्रेंड दरम्यान विशटेल या कंपनीने आता आयआरए आयकॉन मिड एम ८०१ हा टॅब्लेट बाजारात आणला आहे. गेल्या काही दिवसांत ग्राहक या मध्यममार्गी ८ इंची टॅब्लेटकडे वळलेले दिसतात.
६०५ ग्रॅम्स
विशटेलने बाजारात आणलेला हा टॅब्लेट हातात घेतल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया ही त्याच्या वजनाबाबतचीच आहे. याचे वजन ६०५ ग्रॅम्स असून ते काहीसे अधिक वाटते. यापूर्वी याच सदरामध्ये आपण स्वाइप टॅब्लेट पाहिला होता. तो आजवरचा सर्वात कमी वजनाचा टॅब्लेट होता.
वजन वाढले की, टॅब्लेटच्या हाताळणीवर अनेक मर्यादा येतात. तुम्ही एकाच जागी बसून असाल तर अडचण फारशी येत नाही. मात्र तुम्ही प्रवासात असाल तर या मर्यादा अडचणीच्याच ठरतात.
फ्रंट पॅनल
याचे  फ्रंट पॅनल अतिशय चांगले वाटावे असे आहे. ते टीएफटी स्क्रीनमुळे ते दिसायला चांगले दिसते. पुढच्या पॅनलसाठी धातूचा वापर केलेला असला तरी मात्र त्याचे मागचे पॅनल हे प्लास्टिकचे असल्याने तेवढे शोभून दिसत नाही.
स्क्रीन
याचा ८ इंची स्क्रीन टीएफटी असल्याने सुस्पष्ट प्रतिमा देतो. त्याचे रिझोल्युशन १०२४ गुणिले ७६८ आहे. तो मल्टिटच आहे.
उभी रचना
उभ्या आकारात टॅब्लेट पकडल्यास त्याच्या खालच्या बाजूस आपल्याला डावीकडून सर्च, होम, अ‍ॅप्स आणि मागे जाण्यासाठीचे असे चार बटनांचे आयकॉन्स दिसतात. अ‍ॅप्सच्या बटनाच्या माध्यमातून वॉलपेपर, अ‍ॅप्स आणि सिस्टिम सेटिंग्ज बदलता येऊ शकतात.
विविध स्लॉटस्
टॅब्लेट आडवा पकडला तर त्याच्या डावीकडील बाजूस वरती मायक्रो एसडी कार्ड, एचडीएमआय, यूएसबी, डीसी आणि हेम्डफोन जॅक असे स्लॉटस् आहेत. इथे मिनी यूएसबी पोर्ट आहे. मात्र त्याच्या मार्फत उपकरण पीसीला जोडले असता ते चार्ज होत नाही, असे लक्षात आले. याचा अर्थ बाहेर जाताना दर खेपेस आपल्याला यूएसबी मायक्रो यूएसबी चार्जर घेऊन जावा लागणार, असाच आहे.
सिम स्लॉट
खालच्या बाजूस मायक्रोफोन आणि सिम कार्डासाठीचा स्लॉट देण्यात आला आहे. तर आडव्या अवस्थेत पकडल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूस स्पीकर्ससाठीची सोय करण्यात आली आहे. याचे स्टिरिओ स्पीकर्स उत्तम अनुभव देतात.  
अनाकलनीय बटन
वरच्या बाजूस आवाज कमी- अधिक करण्यासाठीच्या बटनाबरोबर त्याच्या दोन्ही बाजूस ऑन- ऑफ करण्यासाठीची दोन बटने देण्यात आली आहेत. त्यातील एका बटनाच्या माध्यमातून आपण ऑन- ऑफ करण्याचे काम करतो. मात्र दुसरे बटन हे एका बाजूने दुसरीकडे सरकवण्यासाठीचे असून ते केल्यानंतर कोणताही फरत नाही. खरे तर याच बटनाच्या बाजूस ऑन- ऑफ असे लिहिण्यात आले आहे. हे बटन का देण्यात आले आहे, असा प्रश्न मनात येतो.
आयइस्क्रीम सँडविच
आयआरए मिड एम ८०१ हा टॅब्लेट अँड्रॉइडच्या ४.०.३ या अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारा आहे. त्याची बिल्ट इन फीचर्स आपल्याला चांगला अनुभव देतात. त्यात ऑडिओ, व्हिडिओ, इमेज या सर्वाचाच समावेश आहे. वेगवेगळ्या फॉरमॅट्चा वापर करतानाही कोणतीही अडचण येत नाही.
प्री- लोडेड अ‍ॅप्स
प्री- लोडेड अ‍ॅप्समध्येही हा टॅब्लेट आपल्याला चांगला पर्याय देतो. त्यात गुगल टॉक, एमएसएन, स्काइप, क्यूक्यू आदींचा समावेश आहे.
बहुभाषक
भारतीय भाषांचा वापर करता शक्य असलेले टॅब्लेटस् बाजारात आणणारी विशटेल ही पहिली कंपनी होती. त्यामुळे साहजिकच त्यांच्या या उत्पादनामध्येही त्या बहुभाषकत्त्वाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे इथे तुम्हाला स्थानिक भारतीय भाषांचा वापर करता येतो.
१.२ गिगाहर्टझ्
या टॅब्लेटसाठी १.२ गिगाहर्टझ् प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तर जीसी ८०० हा ग्राफिक प्रोसेसर वापरला आहे. १ जीबी रॅमचा वापर करण्यात आला आहे. या सर्व बाबींमुळे टॅब्लेटचा वापरकर्त्यांस चांगला अनुभव मिळतो.
८ जीबी इंटर्नल मेमरी
एकूण ८ जीबीची इंटर्नल मेमरी या टॅब्लेटसाठी वापरण्यात आली आहे. त्यातील ६ जीबी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरता येते. २ जीबीचा वापर टॅब्लेटच्या सिस्टिमसाठी केला जातो. तर मायक्रो एसडी कार्डाच्या स्लॉटचा वापर करून ३२ जीबी पर्यंत ही मेमरी वाढविण्याची सोयही देण्यात आली आहे.  
दोन कॅमेरे
या टॅब्लेटला दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यातील समोरच्या बाजूस असलेला कॅमेरा हा व्हीजीए असून तो स्काइप किंवा व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरता येईल. तर मागच्या बाजूस देण्यात आलेला कॅमेरा हा २ मेगापिक्सेलचा आहे. तो फोटो किंवा व्हिडिओ शूटसाठी वापरता येऊ शकतो.
र मेगापिक्सेलचा कॅमेरा अधिक चांगले काम करणारा आहे.
थ्रीजी कनेक्टिवीटी
कनेक्टिविटीसाठी यात वाय- फाय, ब्लूटूथ, असे स्लॉट देण्यात आले आहेत. वाय- फाय ८०२.११ बी/जी तर ब्लूटूथ २.० आवृत्तीचे आहे. महत्त्वाचे म्हणजे हा थ्रीजी टॅब असल्याने त्यात थ्रीजी सिम कार्डाची कनेक्टिविटीही आहेच.
४ तासांची बॅटरी
याची बॅटरी ही ५५०० एमएएचची असून ती तब्बल चार तास चांगली वापरता येऊ शकते. अर्थात चार तास हा इतर टॅब्लेटस्च्या मानाने फार मोठा कालावधी नाही. त्यामुळे याची बॅटरी क्षमता वाढविण्याची अधिक गरज आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. १२,९९९/-