दहावी आणि बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांवरसुद्धा तेवढाच ताण असतो. परीक्षा आटोपल्यानंतर हा ताणसुद्धा निवळतो, पण तरीही निसर्गाच्या सानिध्यात जर अशावेळी जायला मिळाले तर त्या विद्यार्थ्यांसाठी मेजवानीच असते. दहावी आणि बारावीच्या परीक्षा मार्चअखेरीस संपत आहेत. त्यामुळे इतके दिवस परीक्षांच्या ओझ्य़ाखाली वावरलेल्या तणावग्रस्त विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण क्षेत्रातील अग्रगण्य निसर्ग संस्थेने त्यांना निसर्गात वावरण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
मध्य भारतातील पर्यावरण संवर्धनात मोलाची भूमिका बजावत असलेल्या अमरावती येथील निसर्ग संरक्षण संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना वन्यप्राण्यांची माहिती मिळावी तसेच निसर्गाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षी उन्हाळयात मेळघाटच्या जंगलात निसर्ग अभ्यास शिबीर आयोजित करण्यात येते. यंदाचे शिबीर २ ते ४ एप्रिलदरम्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पानजिक संस्थेच्या मुळवा समूदाय केंद्रावर आयोजित करण्यात आले आहे. निसर्ग अभ्यास शिबिरादरम्यान जंगल सफारी, रानवाचन, पक्षी निरीक्षण, वन्यजीवदर्शन, स्लाईड शो, निसर्गखेळ, वन्यजीव संवर्धनावर चित्रपट आदी अनेक उपक्रमांचा समावेश आहे. संस्थेच्या मुठवा केंद्रावर निसर्ग संवर्धनविषयक अनेक गोष्टी कल्पकतेने राबविण्यात आल्या. या सर्वाचा मेळघाटच्या संवर्धनात कसा वापर करायचा हेही यावेळी विद्यार्थ्यांना शिकायला मिळेल. शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे तसेच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. या निसर्ग शिबिरात दहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येईल.
अधिक माहितीसाठी कुणाल पोटोडे ९८९०२६२६७७, निसर्ग संरक्षण संस्था अमरावती कार्यालय ०७२१-२५१०९६६ येथे संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभागी होऊन पर्यावरण चळवळीला चालना देण्याचे आवाहन निसर्ग संरक्षण संस्थेने केले आहे.