गाडी उभी करून थांबलेल्या कार चालकास तुमचे पैसे खाली पडले आहेत, असे सांगून दुसऱ्या बाजूस कारचा दरवाजा उघडून कारमधील मौल्यवान वस्तू गायब करणाऱ्या टोळीस एपीएमसी पोलिसांनी जेरबंद केले आहे.
वाहनचालकास रस्त्यावर पडलेल्या नोटांचा मोह न आवरल्याने अशा प्रकरच्या अनेक गुन्ह्य़ांची नोंद एपीएमसी व वाशी पोलीस ठाण्यात झाली होती. सदर टोळीस पकडण्यासाठी एपीएमसी पोलिसांनी जलाराम मार्केट येथे सापळा रचला. पोलिसांनाच एका कार पार्किगमध्ये उभे करून त्यात एक ड्रायव्हर व बॅग ठेवून आदी पोलीस बाजूला असणाऱ्या पानटपरीपाशी जाऊन उभे राहिले. काही काळांनतर ४ जणांनी त्या ठिकाणी येऊन गाडीत डोकावून पाहत सदर गाडीत काळी बॅग दिसली. त्यातील एका इसमाने १० रुपयांच्या ११ नोटा खाली टाकल्या. इतक्यात दुसरा इसम तिथे आला व तुमच्या नोटा खाली पडल्या आहेत असे सांगत खाली पडलेल्या नोटा पाहून कारचा ड्रायव्हर खाली उतरताच पलिकडील बाजूने टोळतील एका इसमाने कारचा दरवाजा उघडून गाडीतील काळी बॅग उचलली. हे सर्व पाहून दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने आरोपीवर झडप घालून त्यातील एका इसमास जागेवर ताब्यात घेतले. सदर टोळीतील दोन आरोपीना पोलिसांनी मुंब्रा येथन अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गोपाल सुब्रमण्यम, प्रसाद मुरुगुन, योगेश सुब्रमणी. हे तिघेही तामिळनाडूचे रहिवासी आहेत. या आरोपींकडून लॅपटॉप, अ‍ॅपल मोबाइल, ३३० हॉगकॉंग डॉलर, ११ हजार रुपये असा माल हस्तगत केला आहे. आरोपींनी वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३, नेरुळ २, तुभ्रे १, एपीएमसी २ अशा ८ ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
वाशी खाडीत आत्महत्या
वाशी खाडीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना मंगळवारी घडली. खाडीच्या पाण्यात मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. अधिक चौकशी केला असता सदर मृतदेहाची ओळख पटली असून महेश कदम ३३ या तरुणांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या चार दिवसांपासून महेश कदम बेपत्ता होता. त्याच्या हरविल्याची तक्रार नेरुळ पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. दरम्यान मृतदेह वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.