स्ट्रेचरचा उपयोग रुग्णांना नेण्यासाठी केला जातो, पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) स्ट्रेचरचा उपयोग गेल्या काही दिवसांपासून चक्क साहित्य वाहून नेण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना ‘स्ट्रेचर’ व व्हील चेअर्स साठी ताटकळत उभे राहावे लागत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय म्हणून ख्याती आहे. मेडिकलमध्ये १४०१ खाटांची व्यवस्था आहे. एकूण ४६ वॉर्ड असून इतर विभाग २५ च्या जवळपास आहेत. खाटांची संख्या १ हजार ४०१ असली तरी रुग्णालयात १५०० ते १६०० रुग्ण दाखल होतात. बाह्य़ रुग्ण विभागात १६०० ते २ हजार रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जातात. दोन दिवसापूवी अर्धागवायूने ग्रस्त झालेल्या नरखेड तालुक्यातील रामदास हिरा क्षीरसागर याला रुग्णालयात आणले असता  स्ट्रेचर उपलब्ध नव्हते. त्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांकडे मागणी केली. मात्र,  शेवटपर्यंत त्यांना उपलब्ध होऊ शकले नाही. स्ट्रेचरची ने आण करणारे जागेवर राहात नसल्यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना स्वत: स्ट्रेचर घेऊन जावे लागत असल्याचे चित्र मेडिकमध्ये दिसून येते.
अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला किंवा कुठल्याही आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आणले की त्याला स्ट्रेचरने अपघात विभागात किंवा बाह्य़ रुग्ण विभागात नेले जाते. त्यानंतर संबंधित वार्डात उपचारासाठी नेण्यात येते. सध्या मेडिकलच्या अपघात विभागात रुग्णांची ने आण करण्यासाठी ५ ते ६ स्ट्रेचर व २ ते ३ व्हील चेअर्स आहे. एकूण ४६ वॉर्डात प्रति वॉर्ड एक किंवा दोन असे जवळपास ६५ ते ७० स्ट्रेचर असल्याचे मेडिकल प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात रुग्णालयामध्ये बाह्य़रुग्ण विभागात किंवा विविध वॉर्डामध्ये स्ट्रेचर उपलब्ध नसल्याची तक्रार अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी केली.
संबंधित वार्डाच्या डॉक्टरांना आणि परिचारिकेला विचारणा केली असता ते सुद्धा दुर्लक्ष करीत असतात. रुग्णांच्या नातेवाईकांनाच तुम्ही पाहू घ्या अशी उत्तरे दिली जातात. त्यामुळे स्ट्रेचर किंवा खुर्ची शोधण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना शोध घ्यावा लागतो. रुग्णालयातील एखादा कर्मचारी स्ट्रेचर घेऊन असेल आणि तो सापडलाच तर त्याच्या हाती ५० ते १०० रुपये दिल्याशिवाय स्ट्रेचर घेऊन येत नसल्याचे अनेकांनी सांगितले.
कर्मचाऱ्याला पैसे दिले नाही तर कर्मचारी वॉर्डामध्ये स्ट्रेचर सोडून जात असतो त्यामुळे रुग्णाला वार्डातून संबंधित विभागापर्यंत ने आण करण्याचे काम त्यांच्या नातेवाईकांना करावे लागते. यासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, स्ट्रेचरचा उपयोग हा रुग्णांसाठी असल्यामुळे त्याच्यावर साहित्य किंवा कुठलीही वस्तू नेल्या जात असतील तर संबंधितांची चौकशी करण्यात येईल.
सध्या रुग्णालयात स्ट्रेचर आणि खुच्र्याची संख्या कमी असली तर प्रत्येक वार्डामध्ये स्ट्रेचर आणि खुर्ची ठेवण्यात आली आहे. १५ स्ट्रेचर आणि २० नवीन खुच्र्यांचा प्रस्ताव देण्यात आला असून त्या लवकरच उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.