सणासुदीच्या काळात सोने खरेदी मोठय़ाप्रमाणावर होत असते. ही खरेदी करताना तसेच सोन्याचे दागिने वापरताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत ‘महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळा’ने काही सूचना केल्या आहेत.
सोने खरेदी केल्यावर टॅक्स इनव्हॉइस घ्या.
टॅक्स इनव्हॉइसमध्ये दुकानाचे संपूर्ण नाव, पत्ता, व्हॅट, सी. एस.टी. क्रमांक, खरेदीची तारीख, दागिन्याचे ढोबळ वजन, निव्वळ वजन, दागिन्याचे वर्णन, सोन्याचा दर, घडणावळ, इतर कर आदी स्पष्ट नमूद असावे.
दागिना खरेदी केल्यावर त्याची कलर झेरॉक्स काढावी. त्याच्या मागील बाजूस बिलाची झेरॉक्स प्रत लावावी. (चेन, मंगळसूत्र असेल तर त्याची लांबी लिहावी.)
२३ कॅरेट, २२ कॅरेटचे दागिने अतिशय सांभाळून वापरावेत. वापरून झाल्यास शक्यतो डब्यात ठेवावे.
कलाकुसरीचे, नाजूक, खडे मोती बसविलेले दागिने १८ कॅरेटमध्ये करावेत.
दागिने वापरतेवेळी तुटल्यास किंवा वेडेवाकडे झाल्यास दुरुस्तीसाठी आपण दागिने ज्या दुकानातून खरेदी केलेत त्याच दुकानात दुरुस्तीसाठी द्यावेत. आपण गाडी घेतल्यावर जशी काळजी घेतो त्याचप्रमाणे वर्षां-दोन वर्षांनी दागिने देखभालीसाठी दुकानात द्यावेत.
हिरे-मोती अथवा अंगठी, वळे, खडे, हारातील खडे जर वावरताना कपडय़ांमध्ये अडकले तर ते ताबडतोब सोनाराकडे दुरुस्तीसाठी द्यावेत. अन्यथा खडे पडण्याची शक्यता असते.
या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळा’शी mssm.mumbai@gmail.com किंवा  mssm.co.in  येथे संपर्क साधू शकतात.