शहरातील एकाही शासकीय रुग्णालयात ‘टॅमी फ्लू’ औषध उपलब्ध नसल्याने ‘स्वाईन फ्लू’चे लक्षणे असलेला रुग्ण आला तर त्याला कोणती औषधे द्यावी, असा प्रश्न डॉक्टरांपुढे उपस्थित झाला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), महापालिकेचे रुग्णालय आणि आरोग्य उपसंचालक कार्यालयात जवळपास पाच हजार ‘टॅमी फ्लू’ उपलब्ध आहेत. परंतु या औषधाची मुदत ३० ऑगस्टलाच संपली असल्याने त्याचा वापर करता येऊ शकत नाही. नुकताच तिरोडा येथील एका डॉक्टरचा मृत्यू ‘स्वाईन फ्लू’ने झाला आहे. त्यामुळे उपराजधानीसह पूर्व विदर्भात ‘स्वाईन फ्लू’चा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या गणेशोत्सवाचे दिवस आहे. ठिकठिकाणी गर्दी होत असते. अशावेळी विषाणू आपले हातपाय पसरवल्याशिवाय राहणार नाही. अशा परिस्थितीत शासकीय रुग्णालयात ‘टॅमी फ्लू’ हे औषधच नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘स्वाईन फ्लू’चा संशयित रुग्ण कालच मेडिकलमध्ये आला होता. औषध कालबाह्य़ झाल्याने त्याला डॉक्टर ‘टॅमी फ्लू’ देऊ शकले नाही. आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी राज्यातील सर्व उपसंचालकांना स्थानिक पातळीवर ‘टॅमी फ्लू’ खरेदी करण्याचे अधिकार दिले आहेत. परंतु हे अधिकारी दिलेल्या अधिकाराचा वापरच करत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
मेडिकलमध्ये जवळपास तीन हजार ‘टॅमी फ्लू’च्या गोळ्या होत्या. परंतु त्याची मुदत संपल्याने त्याचा वापरच करता येत नाही. त्यामुळे ‘टॅमी फ्लू’ गोळ्या आणि सिरप उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच शासनाकडे करण्यात आली होती. परंतु शासनाने अद्यापही हे औषध उपलब्ध करून दिले नसल्याची माहिती सामाजिक औषधशास्त्र व नियंत्रण विभाग प्रमुख डॉ. अरुण हुमणे यांनी दिली.
हीच स्थिती मेयो व महापालिकेच्या रुग्णालयात निर्माण झाली आहे. सध्याचे वातावरण ‘स्वाईन फ्लू’चा प्रसार होण्यास मदत करणारे आहे. त्यामुळे या काळात औषधांचा साठा उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.