भारतीय दूरसंचार कंपन्यांच्या उत्पन्नामध्ये इंटरनेटच्या वापरामुळे २० हजार कोटी रुपयांची वाढ होणार असल्याचे एटी कर्नी आणि गुगल यांनी केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. मोबाइल इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेता पुढील तीन वर्षांमध्ये दूरसंचार कंपन्यांच्या उत्पन्नवाढीचा आढावा या अभ्यासात घेण्यात आला आहे.
देशात १५५ दशलक्ष मोबाइल इंटरनेट वापरकर्ते आहेत. भविष्यात ही संख्या आणखी वाढणार असून २०१७ मध्ये ती ४८० दशलक्षपर्यंत पोहोचेल, असा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे. पुढील तीन वर्षांमध्ये स्मार्टफोन ३८५ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचेल, असा अंदाजही यामध्ये व्यक्त करण्यात आला आहे, तर यामुळे ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांची संख्या १६० दशलक्षपर्यंत पोहोचेल असेही अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे. मोबाइल फोनवरील डेटाचा वापर हा तिप्पट होणार असून ग्राहक पाचपट अधिक माहिती यावर गोळा करतील, असेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. देशातील हा विकास दूरसंचार कंपन्यांसाठी मोठी संधी असणार आहे. दूरसंचार कंपन्यांचे ७० टक्के उत्पन्न हे डेटा कनेक्शनमधून मिळते.
आतापर्यंत मोबाइल डेटा कनेक्शनचा वापर हा डिजिटल माहिती आणि सेवांसाठी होत होता. भविष्यात कंपन्यांना ई-स्टोअर्स आणि ई-केअरची सुविधा पुरवावी लागणार असल्याचे ए. टी. कर्नीचे पार्टनर निकोलाई डोब्रेस्टेन यांनी स्पष्ट केले. कंपन्यांनी यावर जर मनोरंजनात्मक माहितीसाठा पुरविला तर ७३ टक्के  डेटा कनेक्शनधारक मोबाइल डेटाचा वापर आणखी वाढवतील, असे मत गुगल इंडियाचे विक्री आणि कार्यवाही विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष राजन आनंद यांनी स्पष्ट केले. यामुळे भारतीय दूरसंचार ही मोठी संधी असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. २०१७ पर्यंत प्रत्येकाचा इंटरनेटचा वापर हा दुप्पट होण्याचा अंदाजही या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे.