कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा पांढरा हत्ती पोसताना अक्षरश नाकीनऊ आलेल्या ठाणे महापालिकेने शहरातील आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी यापुढे खासगीकरणाचा पर्याय स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून ठाणे, खारेगाव आणि दिवा भागातील चार भूखंडांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी प्रतिष्ठित संस्थांना हिरवा गालिचा अंथरण्यात आला आहे. आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी अशा प्रकारे खासगीकरणाचा मार्ग स्वीकारावा का, यावरून महापालिका वर्तुळात वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त होत असताना आयुक्त असीम गुप्ता यांच्या कल्पनेतून पुढे आलेल्या या धोरणाला विरोधी बाकांवरील नगरसेवकांनी आतापासूनच विरोध सुरू केला आहे. प्रशासनाच्या या धोरणामुळे विद्यमान अवस्थेतील आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी महापालिकेची आर्थिक बाजू तोकडी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होऊ लागले आहे.
ठाणे महापालिका सद्यस्थितीत २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, पाच प्रसूतिगृहे आणि एक मोठे रुग्णालयाच्या माध्यमातून ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमध्ये आरोग्य व्यवस्था पुरविते. असे असले तरी प्रमुख आरोग्य केंद्रांमधील असुविधांच्या अनेक तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा भार प्रशासनाला नकोसा झाला आहे. या रुग्णालयातील गैरसोयी दूर करायच्या असतील तर काही कोटींच्या घरात खर्च येणार आहे. महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता हा भार सहन करणे महापालिकेला परवडणारे नाही. त्यामुळे कळवा रुग्णालय राज्य सरकारकडे हस्तांतरित केले जावे, अशा स्वरूपाचा प्रस्ताव मध्यंतरी ठाणे महापालिकेचे आयुक्त असीम गुप्ता यांनी मांडला होता. तत्कालीन उच व वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आग्रहामुळे गुप्ता यांनी हा प्रस्ताव पुढे रेटल्याने सत्ताधारी शिवसेनेने मात्र त्यास विरोध केला. त्यामुळे कळवा रुग्णालयाचा पांढरा हत्ती राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याच्या मुद्दय़ावरून ठाण्यातील राजकारण यापूर्वीच तापले आहे.
या पाश्र्वभूमीवर शहरातील चार भूखंडांवर खासगीकरणाच्या माध्यमातून रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केल्याने या मुद्दय़ावरून नवा वाद उभा ठाकला आहे. ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ात एकूण १० भूखंड रुग्णालयासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. विकास आराखडय़ास मंजुरी मिळून तब्बल १५ वर्षे उलटली तरी रुग्णालयांच्या आरक्षणाचा विकास करणे मात्र महापालिकेला जमलेले नाही. आरक्षित असलेल्या भूखंडांपैकी दोन ठिकाणी लहान रुग्णालये उभी राहिली असून तीन ठिकाणी ‘सीआरझेड’चा अडथळा आहे. कौसा येथील एका भूखंडावर १०० खाटांचे रुग्णालय उभारण्याची निविदा नुकतीच स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित चार भूखंडांवर खासगी तत्त्वावर सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने पुढे आणला आहे. घोडबंदर मार्गावरील माजिवडे, ढोकाळी, कळवा परिसरात खारीगाव आणि दिव्यालगत असलेल्या देसाई येथील भूखंड यासाठी आरक्षित ठेवण्याचा प्रस्ताव आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी निविदा प्रक्रियेद्वारे हे भूखंड वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी काही नियम आखण्यात आले आहेत. सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहिल्यानंतर वार्षिक उलाढालीच्या आठ टक्के रक्कम संबंधित संस्थेस ठाणे महापालिकेस द्यावी लागणार आहे. हे धोरण ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले असून विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यास विरोध सुरू केला आहे.
ठाणे शहरातील आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी नव्याने निधी उपलब्ध करण्यात मोठय़ा प्रमाणावर अडचणी उभ्या राहत आहेत. याशिवाय एखादे रुग्णालय उभे केल्यास त्या ठिकाणी कर्मचारी भरती करण्यास राज्य सरकारकडून हिरवा कंदील दाखविला जात नाही. कळवा रुग्णालयातील डॉक्टरांच्या भरतीचे अनेक प्रस्ताव सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे खासगीकरणाशिवाय पर्याय नाही, असा दावा महापौर संजय मोरे यांनी वृत्तान्तशी बोलताना केला.