दहशतवादी हल्ला किंवा मोठा अपघात घडल्यानंतरच जनसुरक्षेचे प्रस्ताव मार्गी लावण्याचा जणू पायंडा पडला आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर नागपूर रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेसाठी प्रस्तावित एकात्मिक सुरक्षा प्रणालीस रेल्वेने लाल झेंडा दाखविला आहे.
नागपूर रेल्वे स्थानकाला दहशतवाद्यांचा धोका असल्याची गुप्त माहिती काही दिवसांआधी प्राप्त झाली. त्यामुळे तेथील श्वानपथकाची गस्त वाढविण्यात आली, असे रेल्वे सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. गुप्तचर यंत्रणेकडून अशी गंभीर माहिती येत असूनही प्रशासन रेल्वे स्थानकाच्या र्सवकष सुरक्षा प्रणालीच्या प्रस्तावाकडे कानाडोळा करून प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. रेल्वे स्थानक म्हणजे विमानतळ नव्हे, त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेचा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. स्थानकावर अनेक मार्ग आहेत. अनेकदा गाडी रेल्वे स्थानकावर दाखल होण्याआधी ‘आऊटरवर’ ताटकळत असते. येथूनच अनेक प्रवासी बाहेर पडताना दिसतात. रेल्वे स्थानकावर पोहोचण्यासाठी अनेक मार्ग असल्याने असे घडत आहे. यावर प्रतिबंध करण्यासाठी सहा फूट उंच संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव आहे, पण एकूणच रेल्वेची आर्थिक परिस्थिती आणि प्रवाशांच्या जीवाचे गांर्भीय याचा ताळमेळच नसल्याने एकात्मिक सुरक्षा प्रणालीचा प्रस्ताव थंडबस्तात ठेवण्यात आला आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावर पश्चिम आणि पूर्व, अशा दोन्ही बाजूने अधिकृत प्रवेशद्वारे असले तरी लोखंडीपूल, रामझुला, डीआरएम कार्यालयामागील बाजूने आणि रेल्वे टपाल कार्यालयाजवळून पूर्व बाजूला पार्सल कार्यालय, गुरुद्वारा, तिकीट घराच्या मागाच्या बाजूनेही रेल्वे स्थानकावर ये-जा केली जाऊ शकते. हा देशातील काही प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. नागपूरमार्गे सर्वच महानगरांकडे गाडय़ा जातात. यामुळे नागपूरसाठी एकात्मिक सुरक्षा प्रणाली प्रस्ताव आला. यात रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेबद्दल र्सवकष विचार करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्थेतील मनुष्यबळ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ यात घालण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार व्हीडिओ कॅमेरे, बुलेट प्रुफ जॅकेटस्, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर्स, हँड हेल्ड मेटल डिटेक्टर्स, वेपन ट्रेसर, नार्कोटिक्स आणि ज्वलनशील पदार्थ शोधून काढणारे यंत्र, तसेच कार ओपनिंग टूल डिव्हाईस, बॅगेज स्कॅनर आदी अत्याधुनिक यंत्रांचा समावेश आहे. तसेच पोलीस जवान आणि श्वानपथकांचाही विचार करण्यात आला आहे.
सध्या या रेल्वे स्थानकावर काही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, परंतु अद्याप स्थानकाचा बराचसा भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कक्षेबाहेर आहे.
मुख्य आणि पूर्व प्रवेशद्वार प्रत्येकी एक डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर आणि मुख्य प्रवेशद्वार बॅगेज स्कॅनर लावण्यात आले आहे, पण प्रत्येक प्रवाशाला आणि प्रत्येकाचे सामान मेटल डिटेक्टरच्या नजरेतून जाईलच, अशी व्यवस्था नाही. तसेच या दोन प्रवेशद्वारांशीशिवाय जुने पार्सल कार्यालय, रेल्वे तिकीट आरक्षण कार्यालय आणि कामगार संघटनेच्या कार्यालयाजवळ प्रवेशद्वार आहेतच.
दोन महिन्यात सर्व आलबेल -कमांडन्ट चौधरी
सीसीटीव्ही अद्ययावत करण्यात आले आहेत. चित्रांची गुणवत्ता वाढली आहे. स्वागतकक्षात बदल करून व्यवस्थित करण्यात आले आहे. श्वानपथक सुसज्ज राहील, याची काळजी घेण्यात आली आहे. जवानांची भरती झाली असून प्रशिक्षणही सुरू आहे. दोन ते अडीच महिन्यात जवानांची कमरता दूर होईल, असे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे सहाय्यक सुरक्षा कमांडन्ट संजय चौधरी म्हणाले.
* महिला पोलीस शिपायाची कमतरता
* सहा फूट उंच संरक्षण भिंतीचा प्रस्ताव बारगळला
* स्थानकावर पोहोचण्यासाठी अनेक अवैध मार्ग
* एकात्मिक सुरक्षा प्रणाली थंडबस्त्यात
* स्थानकाचा बराच भाग सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेबाहेर