टाळ मृदुंगाच्या जयघोषात विठ्ठल नामाचा गजर करीत विदर्भाची पंढरी असलेल्या धापेवाडय़ासह विविध विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात भजन व कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
धापेवाडय़ातील चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज सकाळी खरेदी विक्री संघाचे बाबासाहेब घोडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पूजा झाल्यावर विविध जिल्ह्य़ातून आलेल्या हजारो भाविकांनी विठ्ठलनामाचा गजर करीत विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींचे दर्शन घेतले. नागपूरवरून पायीवारी करीत निघालेली दिंडी आज सकाळी विठ्ठल मंदिरात पोहोचल्यावर दिंडीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांनी दर्शन घेतले. सकाळी नऊ नंतर आजूबाजूच्या गावातील वारकरी हरिनामाचा गजर करीत मंदिराकडे येत होते. सकाळी पूजा झाल्यानंतर दर्शनासाठी जवळपास १ किलोमीटपर्यंत भाविकांची रांग लागली होती. चंद्रभागेच्या तीरावर अनेक वारकरी विठ्ठल नामाचा गजरात तल्लीन झाले होते. यावर्षी पाऊस लांबल्याने चंद्रभागा नदीत पाणी नव्हते. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीतर्फे परिसरात भाविकांना नीट दर्शन घेता यावे यासाठी मंदिर परिसरात कठडे उभारण्यात आले होते. परिसरात हार, फुले, प्रसाद व विविध वस्तूंची दुकाने थाटली होती. मध्यप्रदेशातील पांढुर्णा, सौंसर व छिंदवाडामधील वारकरी दर्शनासाठी आले होते. मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या कोलबास्वामीच्या मठात जाऊन अनेकांनी दर्शन घेतले. यावेळी पूजेच्यावेळी देवस्थानचे सचिव विठ्ठलराव भट, सरपंच गोविंद शेटे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंदिराकडे येणारा मार्ग मोठय़ा वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. १२ व १३ जुलैला धापेवाडय़ामध्ये पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
शहरातही विविध भागातील विठ्ठल मंदिरात आज सकाळी पूजा करण्यात आल्यानंतर भाविकांनी दर्शन घेतले. प्रतापनगर, गोपाळनगर, गणेशपेठमधील विठ्ठल मंदिर, कर्नलबाग येथील भोसलेकालीन घुईंचे विठ्ठल मंदिर आणि नबाबपुरा भागातील विठ्ठल मंदिर, सुभाष नगर, जुनी मंगळवारी भागातील मारोतराव राऊत यांच्याकडील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन भाविकांनी दर्शन घेतले. नंदनवन भागात जवाहर गुरुकुल शाळेतील विद्याथ्यार्ंची आणि शिक्षकांची टाळ मृदुंगाच्या निनादात दिंडी निघाली. यावेळी शाळेतील मुले वेगवेगळ्या संतांच्या वेशभूषेत दिंडीमध्ये सहभागी झाले होते.
डॉ. बाबासाहेब नंदनपवार यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली. याशिवाय शहरातील महापालिका शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली आणि शहरातील विविध मंदिरात भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.