अपघात अनेकदा टाळता येऊ शकतो. शहरातील वाढते अपघात पाहता त्याचे प्रमाण नक्कीच कमी करता येऊ शकते. त्यासाठी केवळ वाहन चालकच नव्हे तर प्रशासनालाही काळजी घ्यावी लागेल.
अपघात टाळण्यासाठी पोलीस नागरिकांना वेळोवेळी सूचना देत असतात. त्याचे पालन करण्याची गरज आहे. वाहतूक नियमांची सक्तीने अंमलबजावणी, शीघ्र वैद्यकीय उपचार, वाहतूक नियमांची जनजागृती हा तीन कलमी कार्यक्रम राबवल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. वाहन चालक हेल्मेट घालणे टाळतात. नागरिकही वाहतूक नियमांकडे कानाडोळा करून वेगात वाहने चालवतात. लोकसंख्या तसेच वाहनांची संख्या वाढली तरी रस्ते तेवढेच आहेत. रस्ते रुंद करण्याची गरज आहे. निकृष्ट रस्त्यांमुळे अपघात व त्यातून होणारी दुखापत जिवघेणी ठरते. वाहतूक पोलिसांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१३ दरम्यान शहरात वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी एकूण २ लाख ८५ हजार ४८५ केसेस केल्या. त्यापैकी २ लाख ७३ हजार ८४३ प्रकरणात तडजोड करून त्यापोटी ३० कोटी ६८ लाख ९ हजार २०० रुपये तडजोड शुल्क प्राप्त केले.
वैद्यकीय उपचार देशात महागडे झाले आहेत. प्रवासाला निघण्यापूर्वी वाहन चालकांनी वाहनांची स्थिती तपासून पाहण्याची गरज आहे. टायरमधील हवा, ब्रेक, दिवे व्यवस्थित आहे की नाही, याची शाश्वती करून घ्यावी. चालकाच्या उंचीला सुयोग्य अशी दुचाकी असायला हवी, चालकाची तब्येत ठिकठाक असायला हवी. रस्त्याची स्थिती तसेच वाहतूक पाहून वाहनाची गती असावी, लगेचच गतीवर नियंत्रण मिळवता येईल, एवढीच ती असावी. प्रत्येक पादचारी, दुचाकी चालक, ऑटो रिक्षा चालक, कार चालक, बस चालक तसेच ट्रक चालकांनी स्वत:ची जबाबदारी समजून वाहतूक नियमांचे पालन करावे, विजेचे खांब बाजूला करायला हवे, रस्त्याची स्थिती उत्तम असायला हवी, आवश्यक तेथेच गतिरोधक असावे व ते शासकीय निकषानुसार तयार करायला हवे, रात्री रस्त्यावर विजेच्या दिव्यांचा पुरेसा प्रकाश असावा, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, प्रत्येक दुचाकी चालकाने हेल्मेटचा वापर करायलाच हवा, अशा सूचना पोलीस नागरिकांना वेळोवेळी देतात. अपघात टाळण्यासाठी सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.      (क्रमश:)