ठाणेकर प्रवाशांना सक्षम सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या ठाणे परिवहन उपक्रमाने उशिरा का होईना आपल्या आस्थापनेवरील दांडीबहाद्दर आणि कामचुकार कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. कर्मचारी नाहीत म्हणून पुरेशा बसेस आगाराबाहेर काढता येत नाहीत, असे कारण टीएमटी प्रशासनाकडून अनेकदा दिले जाते. प्रत्यक्षात कर्मचारी आहेत पण कामावर मात्र नाहीत, असे चित्र पुढे येत होते. याप्रकरणी वारंवार तक्रारी पुढे आल्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने वारंवार गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तीला लगाम घालण्याचा निर्णय घेतला असून सुमारे ५०हून अधिक दांडीबहाद्दरांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव आखण्यात आला आहे.
 ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात तीनशेहून अधिक बसगाडय़ा आहेत, मात्र त्यापैकी सुमारे १८० बसगाडय़ा प्रत्यक्षात रस्त्यावर धावतात. उर्वरित बसगाडय़ा आगारात धूळ खात पडलेल्या आहेत. प्रवाशांना दळणवळणाकरिता उत्तम सुविधा मिळावी यासाठी बसेस चालविण्यासाठी ‘टीएमटी’ प्रशासनाने गेल्या काही वर्षांत सुमारे ८१९ चालक तर ९६३ वाहक भरती केले आहेत. याशिवाय प्रशासकीय कामे, बसगाडय़ा दुरुस्ती, तिकीट तपासणीस यांसह अन्य कामांसाठी वेगळा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग भरती करण्यात आला आहे. बसेसच्या संख्येपेक्षा किती तरी अधिक प्रमाणात वाहक-चालक भरले गेल्याच्या तक्रारी सुरुवातीच्या काळात करण्यात येत होत्या. केंद्र सरकारच्या निधीतून जादा बसगाडय़ा ताफ्यात दाखल झाल्यानंतर मात्र नव्याने कर्मचारी भरले गेलेले नाहीत. मोठय़ा प्रमाणावर कर्मचाऱ्यांची खोगीरभरती होऊनही बसेस आगारातच धूळ खात का उभ्या असतात, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर अजूनही प्रशासनाला देता आलेले नाही. त्यामुळे ठाणेकरांना दळणवळणाची समाधानकारक सुविधा उपलब्ध करून देण्यात परिवहन प्रशासन अपयशी ठरले आहे. रस्त्यामध्येच वारंवार बसेस बंद पडणे, बसगाडय़ांची अपुरी संख्या या प्रकारामुळे ठाणेकर प्रवाशी हैराण झाले आहेत.
बेशिस्तीचा कडेलोट
टीएमटीच्या ताफ्यात कर्मचारी आहेत, मात्र त्यामध्ये दांडीबहाद्दरांचा आकडा बराच मोठा असल्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पुढे येत आहेत. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने मोठय़ा प्रमाणावर कर्मचाऱ्यांची भरती झाल्याने येथे बेशिस्तीने टोक गाठल्याची चर्चाही होती. काही कर्मचारी अनेक महिने कामावर गैरहजर राहात असल्याची माहिती पुढे आली होती. अशा सुमारे ६५ कर्मचाऱ्यांना तीन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी बडतर्फ केले होते. या कारवाईमुळे अन्य दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तीला लगाम बसेल, अशी आशा होती. मात्र, राजीव यांची बदली होताच दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांनी परिवहन प्रशासनाला वाकुल्या दाखवत गैरहजर राहण्याचे प्रकार सुरू केले. त्यामुळे राजीव यांच्यापाठोपाठ आता आयुक्त असीम गुप्ता यांनीही दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार, परिवहन प्रशासनामार्फत कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत, अशी माहिती परिवहन सूत्रांनी दिली.
बडतर्फची कारवाई
ठाणे परिवहन सेवेतील सुमारे शंभर वाहक गेल्या काही महिन्यांपासून गैरहजर आहेत, तर त्यापैकी ३० ते ४० कर्मचारी तीन महिन्यांहून अधिक काळ रजेवर आहेत शिवाय १० ते १५ कर्मचारी वैद्यकीय रजेवर आहेत. याशिवाय शंभर चालक गेल्या काही महिन्यांपासून गैरहजर असून त्यापैकी ७० ते ८० चालक तीन महिन्यांहून अधिक काळ कामावरच आलेले नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई होण्याची शक्यता आहे, अशी माहिती परिवहन सूत्रांनी दिली.