विदर्भ गौरव प्रतिष्ठान व अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद नागपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य नाटय़ परिनिरीक्षण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रा. राम जाधव यांचा महापौर प्रा. अनिल सोले यांच्या हस्ते शंकरनगरातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. वि.स. जोग, ज्येष्ठ रंगकर्मी नरेश गडेकर, प्रफुल्ल फरकासे, प्रमोद भुसारी व ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. वैदर्भी कलावंतांचा त्रास वाचविण्यासाठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे विभागीय कार्यालय नागपुरात आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी डॉ. जोग यांनी समारंभात बोलताना केली. राम जाधव उत्तम संघटक व मार्गदर्शक आहेत. त्यांनी अनेक अडचणींवर मात करून ७० वर्षे नाटय़सेवा केली आहे. कलावंतांचा अहंकार व समाजाची असहिष्णुता यांचा विचार करून संतुलित मनाने काम करावे लागते. राम जाधव हे काम उत्तमप्रकारे करतील अशी खात्री आहे. परिनिरीक्षण मंडळाची एक शाखा विदर्भासाठी नागपुरात असावी, अशी अपेक्षाही जोग यांनी व्यक्त केली.
 राम जाधव यांच्या कार्यकर्तृत्वाचा योग्य सन्मान झालेला आहे, असे महापौर सोले म्हणाले. प्रमोद भुसारी यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.  डॉ. गिरीश गांधी यांनी नाटय़ परिनिरीक्षण मंडळाच्या नियमांमध्ये कालानुरूप बदल झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले. सर्व प्रकारचे यश व अपयश पचवणारा हा ज्येष्ठ रंगकर्मी भरपूर मेहनत घेऊन समोर आला आहे याचा आम्हाला आनंद वाटतो अभिमान वाटतो असेही ते यावेळी म्हणाले.
हौशी रंगभूमीच्या चळवळीला उत्तेजन देण्याचे आवाहन राम जाधव यांनी सत्काराल उत्तर देताना उपस्थितांना केले. तसेच त्यांनी यावेळी ‘नटसम्राट’मधील आप्पासाहेब बेलवलकरांचे स्वगत सादर करून रंगभूमीवरील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल फरकासे यांनी केले. प्रभा देऊसकर यांनी संचालन केले. नाटय़ क्षेत्रातील मंडळी यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होती.