महात्मानगर येथे घातक हत्यारे जवळ बाळगून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्यातील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे शहरात मंगळसूत्र चोरीचे सत्र सुरूच असून सातपूर औद्योगिक वसाहतीत पतीसमवेत दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र चोरटय़ांनी लंपास केले.
महात्मानगर परिसरात एक टोळके संशयास्पदपणे फिरत होते. गस्तीवरील पोलिसांनी त्यांना हटकले असता टोळक्यातील तीन जण पसार झाले. पोलिसांच्या हाती आलेल्या प्रशांत जेटीथोर व अरुण कांबळे यांच्याकडे धारदार शस्त्र व लोखंडी कटावणी आढळून आली. टोळक्यातील किशोर बरु, राजेश शर्मा, इरफान खान शेख उर्फ डॉन हे पळून गेले. दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत आर्थिक कारणावरुन झालेल्या वादात तिघांनी मारहाण करून ५० हजार रुपयांचे सोन्याचे हातकडे आणि रोख रक्कम लंपास केल्या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर रस्त्यावरील श्रीरंग नगर येथे हा प्रकार घडला. श्रीरंग हाईट्स इमारतीचे सध्या काम सुरू आहे. सुभाष वरू, निरज वरू व सागर वरू यांनी या ठिकाणी येऊन आपल्यास बेदम मारहाण केल्याची तक्रार शैलेश मुसळे यांनी दिली आहे. यावेळी संशयितांनी ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे कडे आणि रोख रक्कमही काढून घेतली आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनसाखळ्यांची चोरी सुरुच
सोन साखळी खेचून नेण्याचे प्रकार अव्याहतपणे सुरूच असून सातपूर औद्योगिक वसाहतीत दुचाकीवरून जाणाऱ्या दांपत्याकडील मंगळसूत्र चोरटय़ांनी लंपास केले. शामसुंदर शर्मा पत्नी व मुलासह अ‍ॅक्टीवावरून निघाले असताना मोटारसायकलवरील चोरटय़ांनी ३० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र खेचून नेले. आतापर्यंत पायी जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करणाऱ्या चोरटय़ांची हिंमत आता वाढल्याचे ही घटना निदर्शक म्हणता येईल. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.