मायको सर्कल परिसरातील बेशिस्त वाहतुकीला नियंत्रित करण्यासाठी शहर वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने उंटवाडी ते मायको सर्कल रस्त्यावरील एका बाजूचा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णत: बंद केला आहे. मायको सर्कल परिसरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी योजलेला हा उपाय काही नव्या समस्या निर्माण करणारा ठरला आहे. या संदर्भात झालेल्या सर्वेक्षणाअंती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरल्याचे सांगत वाहतूक पोलिसांनी उपरोक्त मार्ग कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रयत्न चालविला आहे. दुसरीकडे पोलीस आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या संगनमतामुळे नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला आहे. या उपायाने नेमके काय साध्य झाले, हा प्रश्न काही वाहनधारकांना पडला आहे.
मायको सर्कल परिसरात त्र्यंबक नाक्याकडे जाणारे तसेच येणारे दोन रस्ते, तिडके कॉलनी, होलाराम कॉलनी, सिडको आणि सातपूर अशा ठिकाणांहून पाच रस्ते येऊन मिळतात. या परिसरातील वाहतूक नियंत्रित राखण्यासाठी कोणतीही स्वयंचलित यंत्रणा नाही. परिणामी, वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. त्यात रिक्षाचालक व दुचाकी वाहनधारकांच्या बेशिस्तीची भर पडत होती. वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. या पाश्र्वभूमीवर, सहा महिन्यांपूर्वी हा रस्ता सर्वेक्षणासाठी दक्षिणमुखी मंदिराच्या एका बाजूने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सिडकोकडून मायको सर्कलकडे येणारी वाहतूक त्र्यंबक-सातपूर रोडमार्गे वळविण्यात आली. तसेच सायंकाळी यामार्गे त्रिमूर्ती चौक वा सिडकोला येण्यासाठी चौफुलीवरील रस्ता बंद असून ही वाहतूक पंचवटी इलाईटसमोरील चौफुलीकडून वळविण्यात आल्याने वाहनधारकांना दररोज द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. वास्तविक, दक्षिणमुखी मारुती मंदिरापासून डावीकडील रस्ता निमुळता आहे. त्या ठिकाणी शासकीय कार्यालये, लहानसे वाहतूक बेट, चहाची टपरी, एक मोठे झाड यामुळे रस्ता अधिकच चिंचोळा झाला आहे. सकाळी सात, दुपारी १२, सायंकाळी ४ ते ७ या वेळेत परिसरात विद्यार्थी, नोकरदार तसेच कामगारांची एकच गर्दी होते. एका बाजूकडील रस्त्यावरील वाहतूक बंद असल्याने दोन्ही रस्त्यांचा भार त्र्यंबक रस्त्यावर येऊन कोंडी होते. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे. मात्र वाहतूक विभाग आपल्या भूमिकेवर ठाम आहे. या संदर्भात वाहतूक विभागातील अधिकारी एम. एम. बागवान यांनी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवल्यामुळे वाहतूक कोंडी होत नसल्याचे सांगितले. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून पोलीस आयुक्तांच्या देखरेखीखाली पुन्हा एकदा सर्वेक्षण करून हा रस्ता कायमस्वरूपी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. तसेच, सिग्नलजवळ असणारे वाहतूक बेट, झाड आणि स्वच्छतागृह काढून ती जागा मोकळी करण्यासाठी पालिकेशी पत्रव्यवहार सुरू आहे. वाहतूक विभागाची मागणी मान्य झाल्यास या सर्व हालचालींना वेग येईल, असेही बागवान यांनी सांगितले.

पोलीस आणि बांधकाम व्यावसायिक यांचे संगनमत
नगरसेवक निधीच्या माध्यमातून मायको सर्कलकडून त्रिमूर्ती चौकात जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण केले. हा रस्ता वाहतुकीसाठी सुलभ होता. मात्र, बेशिस्त वाहतुकीचे कारण पुढे करीत सहा महिन्यांपूर्वी तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोणा एका बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी वाहतूक विभागाने नागरिकांना वेठीस धरले आहे. एक तर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करीत त्या ठिकाणी आवश्यक तेवढे मनुष्यबळ पुरवा अन्यथा लवकरात लवकर फ्लायओव्हर तयार करावा. ही स्थिती राहिली तर आगामी कुंभमेळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या या रस्त्याची काय अवस्था होईल? याबाबत लवकर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडले जाईल.- सुजाता डेरे (नगरसेविका)