राज्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे फळांना अवकळा आली असली तरी भाज्या यातून वाचल्याचे चित्र आहे. त्यामुळेच तुर्भे येथील घाऊक भाजी बाजारात बुधवार, गुरुवारी ६०० ते ७०० ट्रक टेम्पो भरून भाज्या आल्या असून भाज्यांचे दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पावसाच्या नावाखाली ग्राहकांना ठकविणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांपासून ग्राहकांनी सावधान राहण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात शनिवार-रविवार या दोन दिवसांत अनेक ठिकाणी संततधार अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे आंबा, काजू, द्राक्ष. डाळिंब या फळाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. या पावसात शेतातील भाजीदेखील कचाटय़ात सापडेल अशी शक्यता होती पण ती फोल ठरली असून केवळ पाच ते दहा टक्के भाजीवर परिणाम झाला आहे. त्यात पालेभाज्यांचा समावेश आहे. बुधवारी पश्चिम महाराष्ट्रातून भाज्यांचे ७०० ट्रक टेम्पो भरून आले असून तेवढीच मुंबईत गेल्याचे भाजी व्यापारी व माजी संचालक संजय पिंगळे यांनी सांगितले. गुरुवारी ही आवक सहाशे ट्रक होती तर मंगळवारी ही आवक ६५० ट्रक टेम्पो होती. त्यामुळे टोमॅटो, काकडी, प्लॉवर, कोबी, वाटाणा या भाज्यांची आवक सरासरी सारखीच आहे. यात केवळ पालेभाज्यांना काही प्रमाणात फटका बसला आहे, पण तो इतकी मोठा नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. घाऊक बाजारात सोमवारी भाज्यांची आवक कमी झाली. त्यामागे वाहतूक हे कारण होते.
रविवारी अवकाळी पाऊस पडल्याने अनेक वाहतूकदारांनी वाहने रस्त्यावर काढली नाहीत. त्यामुळे या दिवशी आवक घटली होती पण त्यानंतर दोन दिवस ही आवक चांगली आहे पण अवकाळी पावसाच्या नावाखाली काही किरकोळ विक्रेत्यांनी भाववाढ करण्याचा चंग बांधला आहे. या व्यापाऱ्यांना भाजी दरवाढ करण्याचे तर निमित्त लागत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे घाऊक बाजारातील भाज्यांची दर सद्यस्थिती बघून भाजी खरेदी करण्यात यावी, असे आवाहन भाजी व्यापाऱ्यांनी केले आहे.