औरंगाबाद शहर व परिसरात मोटरसायकलींची चोरी करणाऱ्या पाचजणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीकडून चोरीच्या १० मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या. बीड, अहमदनगर व कोल्हापूर येथील या आरोपींना क्रांती चौक पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून आणखी काही चोऱ्यांवर प्रकाश पडण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जाते.
देवा सुभाष चंद्रशेखर (वय २०, शाहूनगर, केडगाव, अहमदनगर, हल्ली प्रगती कॉलनी औरंगाबाद), सनी ऊर्फ संदीप सुरेश पंडित (वय २४, मल्हार चौक, स्टेशन रस्ता, अहमदनगर), वैभव गजानन बोडखे (वय १९, पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, औरंगाबाद), अब्दुल फय्युम अब्दुल जलील (वय ४०, मामला, मोमीनपुरा, बीड) व अस्लम राजेसाहब किल्लेदार (वय २३, यादवनगर, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी औरंगाबाद शहराच्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून या गाडय़ांची चोरी केली होती. पोलिसांनी नगर व बीड येथे जाऊन या गाडय़ा जप्त केल्या. अंदाजे तीन ते साडेतीन लाख रुपये किमतीच्या या गाडय़ा आहेत. आरोपींकडून आणखी मोटरसायकली चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. परिमंडळ १चे पोलीस उपायुक्त जय जाधव, शहर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नरेश मेघराजानी, पोलीस निरीक्षक प्रकाश कुलकर्णी व अशोक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उन्मेष थिटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.