एप्रिलमध्ये होणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी करावी लागणारी १११ प्रभागांची रचना एक आठवडा लांबणीवर पडली असून, ती आता पुढील आठवडय़ात होणार आहे. या प्रभाग रचनेकडे इच्छुक उमेदवार आणि विद्यमान नगरसेवकांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रभाग रचनेनंतर प्रभाग आरक्षण फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात केले जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या प्रभाग रचना आणि आरक्षणाला अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही.
राज्यात नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकांच्या सभागृहाची मुदत ९ मे रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे तोपर्यंत नवीन सभागृह अस्तित्वात येणे आवश्यक आहे. या दोन्ही महापालिकांच्या निवडणुका यापूर्वी बहुसदस्यीय (पॅनल) पद्धतीने घेतल्या जाणार होत्या, मात्र भाजप सरकारने या पॅनल पद्धतीला विरोध केला.
त्यामुळे या निवडणुका एकसदस्यीय पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला असून, निवडणूक आयोग सॅटेलाइटद्वारे या दोन्ही पालिकेतील प्रभागांच्या रचना करीत आहे.
त्यासाठी नवी मुंबई पालिकेने सर्व माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे दिली आहे. त्यानुसार नवी मुंबईत आता ८९ ऐवजी १११ प्रभाग होणार असून, ही रचना संगणकीय पद्धतीने केली जाणार आहे. त्याची माहिती या आठवडय़ात दिली जाणार होती, पण आयोगाची तयारी अद्याप पूर्ण झालेली नसल्याने ही रचना पुढील आठवडय़ात २ किंवा ३ फेब्रुवारी रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहात जाहीर केली जाणार आहे.
त्यानंतर या रचनेवर अधारित आरक्षण सोडत काढली जाणार असून, त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. ही सोडत ९ किंवा १० रोजी होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर लागलीच आचारसंहिता जाहीर होणार असून, एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात पालिकेची पाचवी निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीचे मुख्य आर्कषण म्हणजे नवीन सभागृहात ५० टक्के आरक्षणामुळे ५५ महिला नगरसेवक दिसणार आहेत.
त्यामुळे इच्छुकांनी आपल्या पत्नींची निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे तयार ठेवण्यास सुरुवात केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने अद्याप प्रभाग रचना व आरक्षण यांची तारीख निश्चित केलेली नाही. मेमध्ये सभागृह अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोग हालचाली करीत असून, लवकरच रचना व आरक्षण जाहीर केले जाणार आहे. पालिकेने आपली तयारी ठेवलेली आहे.
-अमरीश पटनिगिरे, उपायुक्त,  नवी मुंबई महापालिका