लोकलमधून पहाटे किंवा रात्री उशिरा प्रवास करताना रेल्वेकडून महिलांच्या डब्यात पोलीस संरक्षण देण्यात येत असले तरी पश्चिम रेल्वेवरील काही गाडय़ांच्या महिला डब्यांमध्ये बसविण्यात आलेल्या यंत्रामुळे झालेले दोन भाग सुरक्षेबाबत अडचणी येत आहेत. या मोटरमुळे डबाच विभागला जात असल्याने नेमक्या कोणत्या डब्यात चढायचे याबाबत महिलांचा आणि पोलिसांचाही गोंधळ होत आहे. एकाच वेळी दोन्ही डब्यांकडे लक्ष देणे पोलिसांसाठीही जिकिरीचे ठरते आहे.
लोकलच्या महिला डब्यांमधील घुसखोर आणि विनयभंगाच्या घटना या समस्या अनेक वष्रे आहेत. यावर तोडगा म्हणून पहाटे व रात्री उशिरा महिला डब्यांमध्ये पोलीस नेमण्यास सुरुवात झाली. मात्र अपुऱ्या पोलीस बळामुळे महिलांच्या केवळ एकाच डब्यात पोलीस बंदोबस्त देता येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर महिलांनी पोलीस असलेल्या डब्यातूनच प्रवास करावा असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले. त्यामुळे चढण्या उतरण्यासाठी सोयीचा नसतानाही अनेक महिला सुरक्षेच्या कारणासाठी मोटरमन केबिनशेजारच्या पोलीस असलेल्या डब्यातून प्रवास करतात. मात्र या डब्यातील सुरक्षेतही विभाजकाचा अडथळा येतो.
रेल्वेवरील विद्युतपुरवठा डायरेक्ट करंटवरून अल्टरनेट करंटवर आणताना जुन्या गाडय़ांतील इंजिनमध्ये सुधारणा कराव्या लागल्या. त्यामुळे काही जुन्या गाडय़ांमधील डब्यात मोटरमधल्या जागेत आणली गेली. या मोटरमुळे डबा विभागला गेला. त्यामुळे तीन दरवाजांचे डबे मधल्या भागात विभागून प्रत्येकी एक दरवाजाच्या दोन लहान भागांमध्ये विभागले गेले. तांत्रिक सुधारणेसाठी रेल्वेने केलेला हा उपाय महिला सुरक्षेच्या आड येत आहे. गाडी सुटताना पहिल्या स्थानकात पोलीस डब्यातील दोन्ही भागांची पाहणी करतात. एका भागात एकच महिला बसली असेल तर तिला शेजारच्या डब्यात येण्याची विनंती केली जाते. मात्र हे केवळ पहिल्या स्थानकापुरतेच राहते. त्यानंतरच्या स्थानकांवर पहिल्या डब्यात चढण्यासाठी उभ्या असलेल्या महिलेला नेमक्या कोणत्या भागात चढायचे हे लक्षात येत नाही. डब्यात चढल्यावर पोलीस नसल्याचे लक्षात आले तरी उतरून दुसऱ्या डब्यात जाईपर्यंत गाडी सुरू होण्याची भीती आणि नंतरच्या गाडीसाठी किमान दहा मिनिटे थांबावे लागण्याची शक्यता यासाठी महिला त्याच डब्यातून प्रवास करतात, असे रात्री नियमित प्रवास कराव्या लागणाऱ्या एका महिलेने सांगितले.
पोलिसांचीही या पार्टशिनमुळे ओढाताण होते. एका डब्यात राहून दुसऱ्या डब्यातील दरवाजाकडे त्यांना सतत लक्ष द्यावे लागते. त्यातच फलाट एकाच दिशेने येत नसल्याने त्यांचा गोंधळ उडतो. शेजारच्या डब्यात कोणी चढल्याचे लक्षात आले तरी तोपर्यंत गाडी सुटली असल्याने पोलिसांना पुढील स्थानक येईपर्यंत काही करता येत नाही. काही वेळा तर फलाटाच्या बाजूच्या दरवाजावर पोलीस उभे राहात असल्याने चढणाऱ्या- उतरणाऱ्या महिलांना अडथळे येत आहेत. रेल्वेला तांत्रिक सुधारणेसाठी पार्टशिन टाकावे लागले हे समजू शकते. मात्र त्यामुळे रात्री व पहाटे प्रवास करणाऱ्या महिलांना त्रास होत आहे. विनयभंगाची एखादी घटना समोर येत असली तरी लोकल सुटताना डब्यात चढणारे अनेक घुसखोर असतात. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहायला हवे, असे रेल्वे प्रवासी उषा गोडसे म्हणाल्या.