‘त्यांनी कधीही खोटय़ाचे खरे केले नाही. तथ्यांचाच आधार त्यांनी प्रत्येक खटला लढवताना घेतला,’ अशा शब्दांत आदरांजली वाहण्याजोगी नावे वकिलीच्या क्षेत्रात कमीच, परंतु अनिल बी. दिवाण यांचे निधन सोमवारी झाल्यानंतर त्यांना आदरांजली वाहणाऱ्या लेखात ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी हा तथ्यपूर्ण उल्लेख आवर्जून केला आहे. सत्याची चाड हा गुण अनेक भारतीय वकिलांनी जपला, त्यापैकी अनिल दिवाण. त्याहीपुढे, जनजीवन अधिक निकोप करण्यासाठी वकिलांनी किंवा विधिज्ञांनीही आपल्या परीने प्रश्नांना भिडले पाहिजे, त्यांच्या निराकरणासाठी झटले पाहिजे, असे त्यांचे चिंतन होते.  यातूनच ऐन आणीबाणीच्या काळात,  लोकनेते  जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने आणि न्या. व्ही. एम. तारकुंडे, रजनी कोठारी, राजिंदर सच्चर आदींना साथ देऊन ‘पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज’ (पीयूसीएल) या संस्थेच्या उभारणीत त्यांनी वाटा उचलला. या संस्थेतर्फे अनेक खटले लढवून, ‘मानवी हक्कवाले’ म्हणून थिल्लरपणे बोळवण करता येण्याजोगी ही संस्था नसून देशातील कायदे अधिक लोकाभिमुख, अधिक मानवकेंद्री  करण्याचे काम आम्ही करतो आहोत, हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले.

भोपाळ वायुगळती खटल्यातही अनिल दिवाण हे पीडितांचे वकील होते. अर्थात, आधी मुंबई उच्च न्यायालयात, मग सर्वोच्च न्यायालयात त्यांनी इतके खटले लढवले की त्यांपैकी महत्त्वाच्या खटल्यांचीही यादी लांबेल.  सर्वोच्च न्यायालयाचे मित्रवकील  (अ‍ॅमिकस क्युरे) म्हणून अनेक खटल्यांत त्यांनी कामगिरी बजावली आहे. कावेरी पाणीवाटप खटल्यात ते कर्नाटकचे वकील होते. राम जेठमलानी यांनी काळय़ा पैशाच्या तपासासाठी गुदरलेल्या खटल्यात दिवाण यांचे युक्तिवाद महत्त्वाचे ठरले होते, परंतु सुब्रमण्यम स्वामी खटल्यात किंवा त्याआधी ‘जैन हवाला’ खटल्यासह बडय़ा पदांवरील कथित भ्रष्टाचाराच्या अनेक खटल्यांमध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे मित्रवकील होते. माहितीचा अधिकार नागरिकांना मिळावा यासाठीची चळवळ वकिलांकडून सुरू झाली, तिचे ते पुरस्कर्ते होते आणि  या अधिकारावर मागल्या दाराने गदा आणण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा त्याविरुद्ध दिवाण यांचा युक्तिवाद हा ‘आधी परवानगी घ्या, मग माहिती मागा’ अशी अट घालण्यामागील सरकारचा कावा उघड करणारा ठरला होता.  खटल्याला कलाटणी देणारा युक्तिवाद त्यांनी अलीकडल्या ‘राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगा’विरुद्धही केला होता.

या युक्तिवादांमागे कायद्यांचा अभ्यास तर होताच, पण सार्वजनिक जीवनाच्या बदलत्या स्थितीगतीची जाण आणि सार्वजनिक जीवनास तत्त्वभ्रष्ट न होऊ देण्याची आस होती. त्यांचे चिंतन सखोल वाटे, ते यामुळे. या चिंतनाने कधी वृत्तपत्रीय लेख, कधी भाषणे तर कधी कायदेतज्ज्ञांच्या परिषदांत वाचलेले निबंध अशी अनेक रूपे घेतली.

वकिलीचा अनुभव असलेल्या घराण्यात १५ मे १९३० रोजी जन्मलेल्या अनिल दिवाण यांना तरुणपणी भारताचे पहिले अ‍ॅटर्नी जनरल एम. सी. सेटलवाड यांचे मार्गदर्शन मिळाले आणि आदर्शही मिळाला. सर्वच प्रकारचे खटले दिवाण वा त्यांच्या फर्मने लढविले असले, तरी ‘पब्लिक लॉ’ हा त्यांचा जिव्हाळय़ाचा  विषय. बार असोसिएशनचे अध्यक्षपद आणि ‘लॉएशिया’या आंतरराष्ट्रीय संघटनेचे अध्यक्षपद (१९९१-९३) त्यांनी भूषविले होते.