भारतात महिला वैज्ञानिकांचे प्रमाण हाताच्या बोटांवर मोजण्याइतके असले तरी अलीकडे अनेक वैज्ञानिक संस्थांत त्या चमकदार कामगिरी करीत आहेत. सीएसआयआरच्या हैदराबाद येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वैज्ञानिक प्रथमा माईणकर यांना अलीकडेच ओपीपीआय महिला वैज्ञानिक पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या संशोधनाने औषधनिर्मितीत महत्त्वाची भर टाकली आहे, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या मूळ तेलंगणातील आहेत. त्यांना सीएनएस म्हणजे चेतासंस्थेशी संबंधित रोग तसेच कर्करोग व क्षयरोगावर संशोधनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

अलीकडे अनेक औषधांना दाद न देणारा मल्टीड्रग रेझिस्टंट टीबीचा (क्षय) प्रकार रूढ आहे. त्यावर औषध शोधण्यासाठी त्यांचे संशोधन उपयुक्त ठरणार आहे. कर्करोग, अस्थमा, चेतासंस्था रोगांवर उपयोगी ठरणारी काही संयुगे त्यांनी प्रयोगशाळेत तपासली असून ती गुणकारी असल्याचे दिसून आले आहे. एकूण १६ लाख संयुगांचा साठा प्रयोगशाळेकडे आहे. त्यातून ११ संयुगे ही क्षयावर गुणकारी असल्याचे दिसून आले आहे. या संशोधनात माईणकर यांचा मोठा वाटा आहे. मायक्रोबॅक्टेरियम टय़ूबरक्युलोसिसवर औषध शोधण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे त्यांनी सांगितले. यातील मानवी चाचण्यांसाठी आणखी दोन-तीन वर्षे लागतील असा अंदाज  त्या व्यक्त करतात. कर्करोगाच्या बाबत तीन गुणकारी संयुगे शोधण्यात आली असून ती रक्ताच्या कर्करोगात उपयोगी असल्याचे उंदरावरील प्रयोगात दिसून आले. मूत्रपिंडाच्या कर्करोगावर गुणकारी दोन औषधी रेणूही सापडले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. झेब्रा फिश व उंदीर या प्राण्यात न्यूरॉन्सना मजबुती देणाऱ्या संयुगांचे प्रयोग त्यांनी केले असून त्याचा उपयोग स्मृतिभ्रंशावर होणार आहे. प्रथमा यांना लहानपणापासून रसायनशास्त्राची गोडी होती. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठातून वनस्पतिशास्त्र, जनुकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांत झाले. तेथेच त्यांनी कार्बनी रसायनशास्त्रात पीएच.डी. केली. सीएसआयआरच्या आयआयसीटी संस्थेतूनही नंतर त्यांनी पीएच.डी. केली. डॉ. एम. के. गुर्जर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केले. साई लाइफ सायन्सेस, एव्होलेव्हा बायोटेक पेन बायोकेमिकल्स अशा अनेक संस्थांत काम केल्यानंतर १९९२ मध्ये त्या सीएसआयआरच्या संस्थेत वैज्ञानिक म्हणून काम करू लागल्या. वैद्यकीय रसायनशास्त्र, औषध संशोधन या शाखांत त्यांचे संशोधन आहे.

एड्स, इबोला व हेपॅटिटिस बी या रोगांवर त्यांनी संशोधन केले असून त्यात त्यांनी असे दाखवून दिले की, सापाचे विष जर होमिओपॅथी औषधाच्या रूपात वापरले तर त्याचा विषाणू रोगांवर चांगला उपयोग होतो.